जरंडेश्वरच्या कर्जपुरवठय़ाची माहिती मागितली

पुणे / वाई : ‘जरंडेश्वर शुगर्स’ला केलेल्या कर्जपुरवठय़ावरून अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’) पुणे आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकांना नोटीस बजावली आहे.

साताऱ्यातील चिमणगाव (ता. कोरेगाव) येथील ‘जरंडेश्वर शुगर्स’ या खासगी साखर कारखान्यावर मागील आठवडय़ात ‘ईडी’ने जप्तीची कारवाई केली. येथील मूळच्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची विक्री प्रकरणाच्या चौकशीतून ही कारवाई करण्यात आली आहे. आता हा कारखाना विकत घेतलेल्या खासगी कारखान्यास ज्यांनी अर्थपुरवठा केला आहे, त्या संस्थांकडे ‘ईडी’ने आपले लक्ष वळवले आहे. या अंतर्गतच या केंद्रीय तपास यंत्रणेने शुक्रवारी पुणे आणि सातारा जिल्हा बँकांनाही नोटीस बजावली असून या कर्जप्रकरणाची सर्व माहिती मागून घेतली आहे.

या नोटिशीमध्ये बँकेने या खासगी कारखान्याला कर्जपुरवठा किती, कशासाठी आणि कशाप्रकारे केला. त्यासाठी तारण म्हणून मालमत्ता कुठली घेतली. त्याची किंमत किती आहे. या कर्जाची परतफेड कशी होत आहे. कर्जाची थकबाकी किती आहे आदी तपशील मागितले आहेत. सातारा जिल्हा बँकेने या खासगी कारखान्याला २०१७ मध्ये १३२ कोटींचा कर्जपुरवठा केलेला असून यातील ९६.५० कोटी रुपयांच्या कर्जाची रक्कम वसूल होणे अद्याप बाकी आहे.

सातारा जिल्ह्य़ातील कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची विक्री प्रकरणाची सध्या ‘ईडी’कडून चौकशी सुरू आहे. हा कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांनी विकत घेतलेला असून तो सध्या ‘जरंडेश्वर शुगर्स’ नावाने चालवला जात आहे. ‘ईडी’कडून या विक्री व्यवहाराची चौकशी सुरू असून या अंतर्गत या कारखान्यावर मागील आठवडय़ात जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

पुणे आणि सातारा जिल्हा बँकांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपाध्यक्ष सुनील माने, सहकार व पालकमंत्री आणि ज्येष्ठ संचालक बाळासाहेब पाटील तसेच बँकेचे वरिष्ठ संचालक, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी तातडीने ‘जरंडेश्वर’च्या या कर्जप्रकरणाची माहिती घेतली.

जरंडेश्वर शुगर्सला कशासाठी, किती कर्ज दिले आहे, याचा खुलासा करावा याबाबत नोटीस आली आहे. ८५ कोटी रुपयांचे कर्ज दिले असून योग्य तो खुलासा पाठवण्यात आला आहे. आरबीआय, नाबार्ड आणि राज्य बँके ने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कर्जपुरवठा के ला आहे. दिलेले कर्ज नियमित वसूल होत आहे. – रमेश थोरात, अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

बँकेने ‘जरंडेश्वर शुगर्स’ या खासगी कारखान्याला केलेला कर्जपुरवठा रिझव्‍‌र्ह बँक व नाबार्डच्या धोरणानुसारच केलेला आहे. २०१७ मध्ये १३२ कोटींचा कर्जपुरवठा केला होता. यातील ९६.५० कोटी रुपयांच्या कर्जाची रक्कम वसूल होणे अद्याप बाकी आहे. – डॉ. राजेंद्र सरकाळे , मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा सहकारी बँक