पुणे : देशातील खाद्यतेल विक्रीबाबत मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. खाद्यतेलाची विक्री आता ठरावीक वजनाच्या पॅकमध्येच कंपन्यांना करावी लागणार आहे. यासाठी २०० मिली ते २० लिटर अशी वजनाची नऊ परिमाणे निश्चित करण्यात आली आहेत. केंद्रीय ग्राहक कामकाज विभागाने ही नियमावली लागू केली असून, यामुळे ग्राहकांना अधिक पारदर्शकपणे खाद्यतेलाची खरेदी करता येणार आहे. या नियमावलीच्या अंमलबजावणीसाठी खाद्यतेल उत्पादक कंपन्यांना तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.

सध्या बाजारात कंपन्यांकडून विविध वजनांच्या पॅकमध्ये खाद्यतेलाची विक्री सुरू आहे. मात्र, प्रत्येक कंपनीच्या पॅकचे वजन वेगवेगळे असते. त्यातून ग्राहकांना आपल्याला नेमके कोणत्या कंपनीचे खाद्यतेल स्वस्त मिळत आहे, हेच कळत नाही. कारण हे पॅक एकसारखे दिसणारे असतात. या बाबत ग्राहकांकडून सरकारकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सरकारने खाद्यतेलाच्या ठरावीक वजनाच्याच पॅकची विक्री करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर सरकारने देशातील खाद्यतेल उद्योग क्षेत्राचे सुमारे ९० टक्के प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रमुख उद्योग संघटनांशी चर्चा केल्यानंतर खाद्यतेलाची विक्री ठरावीक वजनाच्या पॅकमधून करण्याची नियमावली लागू केली आहे.

या नवीन नियमावलीमुळे ग्राहकांना ठरावीक वजनाच्या पॅकमध्ये खाद्यतेल मिळणार आहे. त्यात प्रमुख खाद्यतेले आणि संमिश्र तेलांचा समावेश आहे. खाद्यतेलाच्या पॅकसाठी वजनाची नऊ परिमाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्यात २०० मिली, ५०० मिली, १ लिटर, २ लिटर, ३ लिटर, ४ लिटर, ५ लिटर, १५ लिटर आणि २० लिटरचा समावेश आहे. या प्रमाणित वजनाच्या पॅकमुळे ग्राहकांना वेगवेगळ्या कंपन्यांच्या खाद्यतेलाच्या किमतीची तुलना करून खरेदीचा अधिक योग्य निर्णय घेणे शक्य होणार आहे. खाद्यतेलाच्या २०० मिली अथवा २०० ग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या पॅकना या नियमावलीतून वगळण्यात आले आहे. ग्राहकांना परवडणाऱ्या दरातील छोटे पॅक उपलब्ध व्हावेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय ग्राहक कामकाज मंत्रालयाने दिली आहे.

नवीन नियमावली

  • खाद्यतेल व संमिश्र तेलांसाठी ठरावीक वजनाचे पॅक
  • पॅकवर वजन आणि आकारमान बंधनकारक
  • देशांतर्गत उत्पादितसोबत आयात खाद्यतेलांसाठीही नियम लागू
  • उत्पादकांना अंमलबजावणीसाठी तीन महिन्यांचा कालावधी
  • दोन उत्पादनांच्या किमतीतील तुलना ग्राहकांसाठी अधिक सोपी

सरकारने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह असून, यासाठी आम्ही सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करीत होतो. हा निर्णय ग्राहकहिताचा असून, खाद्यतेल उद्योगातील अनावश्यक स्पर्धा यामुळे बंद होणार आहे. काही कंपन्यांकडून १ लिटरऐवजी ९०० मिली खाद्यतेलाचे पॅक बाजारात आणून ग्राहकांची फसवणूक केली जात होती. आता असे प्रकार घडणार नाहीत आणि ग्राहक अधिक पारदर्शकपणे खाद्यतेल खरेदी करू शकतो. डॉ. बी. व्ही. मेहता, कार्यकारी संचालक, सॉल्व्हन्ट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया