पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित शाळांतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाच्या सूचना शिक्षण संचालनालयाने दिल्या आहेत. मात्र, समायोजनाची कार्यवाही स्थगित करण्याची मागणी शिक्षण संस्था महामंडळ, मुख्याध्यापक संघाने केली आहे. मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने यांनी शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे ही मागणी केली.

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्यासाठीची प्रक्रिया राबवण्याचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार १३ फेब्रुवारी रोजी शिक्षकांची तात्पुरती यादी जाहीर केली जाणार आहे. ३१ मार्चपर्यंत समायोजन प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच, २०२५-२६ च्या संचमान्यतेनुसार रिक्त, अतिरिक्त पदांची पडताळणी करून अतिरिक्त ठरणारे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची समायोजन प्रक्रिया वेळापत्रकानुसार राबवण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दहावी-बारावीच्या ऐन परीक्षांच्या कालावधीत ही प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर, समायोजन प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळाचे सरकार्यवाह रवींद्र फडणवीस यांनी केली आहे.

तसेच सध्या बारावी, दहावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्यानंतर इयत्ता पाचवी ते नववी, अकरावीच्या परीक्षा एप्रिलच्या मध्यापर्यंत असणार आहेत. पेपर तपासणी, निकाल जाहीर करण्यास १ मे उजाडणार आहे. त्यामुळे समायोजन प्रक्रिया स्थगित करावी. डोंगराळ जिल्ह्यातील सेवकसंचासाठी विद्यार्थिसंख्येची अट शिथिल करावी, सुधारित सेवकसंच करावा, समायोजन प्रक्रिया मे-जूनमध्ये करावी, अशी मागणी मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने यांनी शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली.

जिल्हा, विभाग स्तरावर समायोजन प्रक्रियेअंतर्गत केवळ शिक्षकांची यादी तयार करण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे. समायोजन बदलीचे आदेश दहावी, बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर मार्चअखेरीसच दिले जातील. – डॉ. महेश पालकर, माध्यमिक शिक्षण संचालक