scorecardresearch

पिंपरी महापालिका शाळेतील शिक्षकांचा ताण होणार कमी; मानधनावर १०५ डाटा एन्ट्री ऑपरेटरची पदे भरणार

महापालिकेच्या शिक्षण विभागाने सर्व शाळांसाठी १०५ डाटा एन्ट्री ऑपरेटर कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे.

Pimpri mnc Data Entry Operators
मानधनावर १०५ डाटा एन्ट्री ऑपरेटरची पदे भरणार (image – loksatta graphics/pixabay)

पिंपरी महापालिकेच्या शाळांमधील शिक्षकांचा विद्यार्थ्यांना शिकविण्याऐवजी इतर प्रशासकीय कामकाज, शासनाला विविध माहिती पाठविणे, ही माहिती टाइप करून देणे, अशा विविध कामांसाठी जास्त वेळ जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या शिक्षण विभागाने सर्व शाळांसाठी १०५ डाटा एन्ट्री ऑपरेटर कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांच्या एकूण १०५ प्राथमिक, तर १८ माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये ४२ हजारपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थीसंख्या मोठी असताना महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांची संख्या कमी आहे. त्यामुळे दोन महिन्यापूर्वी पालिकेने सुमारे अडीचशे कंत्राटी शिक्षकांची भरती केली.

हेही वाचा – सट्टेबाजार तेजीत, कार्यकर्त्यांमध्ये पैजा; कसब्याच्या निकालाकडे राज्याचे लक्ष

एकीकडे पालिकेचा शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम राबवत आहे. मात्र, सध्या शिक्षकांना शासन, पालिकेला विविध अहवाल पाठविणे, संच मान्यतेसाठी विद्यार्थ्यांचा डाटा ऑनलाइन भरणे, वैद्यकीय तपासणीची माहिती भरणे, क्रीडा विषय माहिती ठेवणे यासह विद्यार्थ्यांचा सर्व डाटा जतन करणे, संगणकावर एक्‍सेल शीटमध्ये माहिती भरणे यासह विविध कामे करावी लागत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकविण्याऐवजी प्रशासकीय आणि इतर कामकाजात शिक्षकांचा जास्त वेळ जात आहे. यामुळे शिक्षकांचे मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे. याचा विचार करून प्रशासकीय कामकाज करण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने आता १०५ डाटा एन्ट्री ऑपरेटर कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – दहशत माजविणारा गुंड वर्षभरासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध

शिक्षकांचा विविध कामांसाठी बहुमूल्य असा वेळ जात आहे. याचा विचार करून पालिकेच्या सर्व शाळांसाठी १०५ डाटा एन्ट्री ऑपरेटर कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी आणि त्यांना घडविण्यासाठी जास्तीत-जास्त वेळ देता येणार आहे, असे शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत म्हणाले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-03-2023 at 17:09 IST