महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावी आणि बारावीच्या कला, क्रीडा गुण प्रस्तावांसाठी ५० रुपये छाननी शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची फेब्रुवारी मार्च २०२३च्या परीक्षेपासून अंमलबजावणी करण्यात येईल.
कला आणि क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य, राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), स्काऊट गाइड प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावी-बारावीच्या परीक्षेत अतिरिक्त गुण देण्यात येतात. त्यासाठीचा प्रस्ताव विद्यार्थ्यांना शाळेमार्फत सादर करावा लागतो. आतापर्यंत या प्रस्तावांच्या छाननीसाठी शुल्क आकारण्यात येत नव्हते. गेल्या काही वर्षांत या गुणांचा लाभ मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांकडून घेण्यात येत आहे. मात्र आता या प्रस्तावांसाठी छाननी शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला आहे. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना या गुणांच्या प्रस्तावांसाठी शुल्क भरावे लागेल.
छाननी शुल्क आकारण्याच्या प्रस्तावाला राज्य मंडळाच्या कार्यकारी समितीनेही मान्यता दिली आहे. त्यामुळे आता फेब्रुवारी-मार्चपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल, असे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.
कला-क्रीडा गुणांचे प्रस्ताव दिवसेंदिवस वाढत आहेत. दीड ते दोन लाख प्रस्ताव दरवर्षी येतात. या प्रस्तावांची छाननी करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने बाहेरून मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे लागते. त्यासाठी खर्च करावा लागत असल्याने यंदापासून पन्नास रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. – शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य मंडळ