पुणे : विद्येचे माहेरघर, पूर्वेकडील ऑक्सफर्ड अशी ओळख असलेल्या पुणे शहरामध्ये महापालिकेत सभासद म्हणून निवडून आलेल्या १६५ नगरसेवकांपैकी केवळ १४ नगरसेवकांचे शिक्षण ‘पदव्युत्तर पदवी’पर्यंत झाले आहे. महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरताना इच्छुकांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे. सात सभासदांची माहिती मात्र महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध नाही.

महापालिकेची निवडणूक लढवून विजयी झालेल्या आणि सर्वाधिक जागा मिळविलेल्या सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची संधी मिळते. यामध्ये महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष, शहर सुधारणा, विधी समिती, महिला व बालकल्याण, शिक्षण अशा समित्यांचा समावेश असतो. या समित्यांच्या माध्यमातून काम करत असताना नगरसेवक शहराच्या हितासाठी महत्त्वाचे निर्णय घेतात. महत्त्वपूर्ण प्रकल्प राबविण्याची शिफारस विजयी झालेल्या सभासदांकडून केली जाते. त्यामुळे महापालिकेचा कारभार चालविणाऱ्यांचे शिक्षण किती आहे, हा जिव्हाळ्याचा विषय असतो.

माहिती-तंत्रज्ञानाचे शहर अशी ओळख असलेल्या पुणे शहराचा शिक्षण क्षेत्रात मोठा लौकिक आहे. पुण्यात शिक्षण घेण्यासाठी इतर राज्यांतील शहरांमधून आणि परदेशातूनही विद्यार्थी मोठ्या संख्येने दर वर्षी येतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सिम्बायोसिस, अभियांत्रिकी महाविद्यालय या शैक्षणिक संस्थांसह विविध विषयांवर संशोधन करणारी नामांकित विद्यापीठे, शिक्षण संस्था पुणे शहरात आहेत. या संस्थांच्या माध्यमातून दर वर्षी हजारो विद्यार्थी बाहेर पडतात. मात्र, महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलेल्यांमध्ये शिक्षणाचे प्रमाण फारसे नसल्याचे समोर आले आहे.

महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ४१ प्रभागांतून १६५ नगरसेवक विजयी झाले. या १६५ सदस्यांपैकी ३५ टक्के म्हणजे ६१ नगरसेवकांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. तर केवळ ८ टक्के सभासदांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. सर्वसाधारण २० टक्के म्हणजे ३३ सदस्यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. तर, २५ टक्के म्हणजे ४५ सदस्य दहावीपर्यंत शिकलेले आहेत. यामध्ये इयत्ता दुसरी, चौथी, आठवी, नववीपर्यंत शिक्षण घेतलेल्यांचा समावेश आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. १६५ पैकी ११९ जागांवर विजय मिळवत भाजप पहिला क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला २७, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ३, काँग्रेसचे १५ आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाचा एक उमेदवार निवडून आलेले आहे. त्यामुळे सर्वाधिक जागा मिळवणारा भाजप सत्ताधारी पक्ष म्हणून कार्यरत राहणार असल्याचे निश्चित आहे.

दहावीपर्यंत शिकलेले नगरसेवक : ४५

बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले : ३३

पदविका मिळविलेले सदस्य : ०५

पदवी घेतलेले सभासद : ६१

पदव्युत्तर शिक्षण : १४

माहिती उपलब्ध नसलेले सभासद : ०७