पुणे : देशातील प्रमुख औद्योगिक आणि मालवाहतुकीच्या परिसरात ‘युनिव्हर्सिटी टाउनशिप’ उभारण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. या प्रस्तावित योजनेची रूपरेषा निश्चित करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने विविध भागधारकांकडून ऑनलाइन सर्वेक्षणाअंतर्गत अभिप्राय मागवण्यास सुरुवात केली आहे.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) या बाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. केंद्र सरकारने २०२६-२७च्या अर्थसंकल्पात ‘युनिव्हर्सिटी टाउनशिप’ ही संकल्पना मांडली आहे. या प्रकल्पांच्या उभारणीसाठी राज्य सरकारांना केंद्र सरकारकडून मदत केली जाणार आहे. या अंतर्गत पाच ‘युनिव्हर्सिटी टाउनशिप’ प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. या टाउनशिपच्या माध्यमातून विद्यापीठे, महाविद्यालये, संशोधन संस्था, कौशल्य विकास केंद्रे, नवोन्मेष केंद्रे तसेच निवासी सुविधा यांचा एकात्मिक शैक्षणिक परिसर विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच, टाउनशिपद्वारे उच्च शिक्षण, संशोधन, कौशल्यविकास आणि उद्योग यांना एकाच परिसंस्थेत जोडण्याचा सरकारचा विचार आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक, शैक्षणिक प्रशासक, माजी विद्यार्थी, उद्योग प्रतिनिधी आणि अन्य संबंधित घटकांकडून सूचना, अभिप्राय मागवण्यात आले आहेत. या सर्वेक्षणाअंतर्गत सादर होणाऱ्या सूचनांच्या आधारे योजनेची पुढील रूपरेषा निश्चित करण्यात येणार आहे.

युनिव्हर्सिटी टाउनशिपबाबत अभिप्राय नोंदवण्यासाठी उच्च शिक्षण संस्थांनी व्यापक प्रसार करावा. विद्यार्थी, शिक्षक, संशोधक, कर्मचारी, माजी विद्यार्थी, नवोन्मेष परिषद, नवोन्मेष आणि उद्योजकता विकास कक्ष, मार्गदर्शन केंद्र, नवउद्यमी, उद्योग भागीदारांना यात सहभागी करून घ्यावे. शिक्षण संस्थांनी संकेतस्थळांवर, समाजमाध्यमांवर, नोटीस बोर्ड, ई-मेलद्वारे अभिप्राय नोंदवण्याबाबतचा प्रचार-प्रसार करावा. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या गटांमधून या उपक्रमाची माहिती देऊन अधिकाधिकांचा सहभाग सुनिश्चित करावा. अभिप्राय ‘मायगव्ह’ संकेतस्थळावर नोंदवता येणार आहे. तसेच https://secure.mygov.in/mygov-survey/public-consultation-university-townships-initiative या दुव्याचा वापर करता येणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.