पुणे जिल्ह्य़ातील महिला पोलिसांना आठ तासांची डय़ुटी!

अपुरे मनुष्यबळ आणि कामाचे स्वरूप पाहता पोलिसांना किमान बारा तास काम करावे लागते.

(संग्रहित छायाचित्र)

ग्रामीण पोलीस अधीक्षकांची योजना

पुणे : नागपूर पाठोपाठ पुणे ग्रामीण पोलीस दलातही महिला पोलिसांना आठ तासांची डय़ुटी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

सण, आंदोलने, गुन्हे, राजकीय नेत्यांचे दौरे, गुन्ह्य़ांचा तपास अशा कामात अडकून पडलेल्या पोलिसांचे काम म्हणजे ‘ऑन डय़ुटी २४ तास’. अपुरे मनुष्यबळ आणि कामाचे स्वरूप पाहता पोलिसांना किमान बारा तास काम करावे लागते. त्यामुळे पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांच्या तुलनेत महिला पोलिसांची फार तारांबळ उडते. संसार सांभाळून बारा तास नोकरी करणाऱ्या ग्रामीण पोलीस दलातील महिलांना आठ तासांची डय़ुटी देण्याची योजना पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी तयार केली आहे. त्यानुसार बुधवारपासून (१ सप्टेंबर) ग्रामीण पोलीस दलात महिला पोलिसांसाठी आठ तास डय़ुटी लागू करण्यात आली आहे.

वाढती लोकसंख्या, गुन्ह्य़ांमुळे पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे पडत आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी महिला पोलिसांना आठ तासांची डय़ुटी जाहीर केली आहे. त्याची परिणामकारकता आणि उपयुक्तता विचारात घेऊन राज्यातील सर्व शहरांत आठ तासांची डय़ुटी देण्याचा निर्णय विचाराधीन असल्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी नुकतेच सांगितले.

नागपूरनंतर पुणे ग्रामीणमध्ये आठ तासांची डय़ुटी

पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घेतलेल्या निर्णयानुसार बुधवारपासून (१ सप्टेंबर) महिलांना आठ तासांची डय़ुटी देण्यात आली असून या योजनेचा फायदा ग्रामीण पोलीस दलातील साडेतीनशे महिलांना होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Eight hours duty for women police in pune district zws

ताज्या बातम्या