पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून  (एमपीएससी) घेण्यात आलेल्या संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ च्या दुसऱ्या उत्तरतालिकेतील आठ प्रश्न रद्द करण्यात आले आहेत. गेल्या काही परीक्षांमध्ये सातत्याने प्रश्न रद्द करण्याचा प्रकार होत असून त्याबाबत उमेदवारांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.

एमपीएससीकडून २६ फेब्रुवारीला संयुक्त पूर्व परीक्षेची पहिली उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली. या उत्तरतालिकेवर उमेदवारांकडून अधिप्रमाणित स्पष्टीकरणासह हरकती सूचना मागवण्यात आल्या. त्यानंतर आलेल्या हरकती, सूचना आणि तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन एमपीएससीने सुधारित उत्तरतालिका ५ मे रोजी प्रसिद्ध केली. मात्र या सुधारित उत्तरतालिकेत आठ प्रश्न रद्द करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे, तर तीन प्रश्न बदलून देण्यात आले आहेत. या प्रकारामुळे उमेदवारांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या वर्षभरात झालेल्या परीक्षांतील प्रश्न रद्द करण्याचा प्रकार वारंवार झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे एमपीएससीच्या तज्ज्ञ समितीच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ मधील आठ प्रश्न तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसार करण्यात रद्द आले आहेत. प्रश्न रद्द करणे हा प्रक्रियेचा भाग आहे. यात उमेदवारांचे नुकसान होण्याचा प्रश्न येत नाही.

– सुनील अवताडे, सहसचिव, एमपीएससी