अठरा तासांच्या मेगाब्लॉगमध्ये अनेक गाडय़ा रद्द
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामध्ये भायखळा ते छत्रपती शिवाजी टर्मिनल (सीएसटी) रेल्वे मार्गावर असलेला हँकॉक पूल रविवारी पाडण्यात येणार असल्याने शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी संध्याकाळी साडेसहापर्यंत तब्बल अठरा तास पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात एकही रेल्वे मुंबईकडे जाणार नसल्याने त्याचा ताण रस्ते वाहतुकीवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रविवारी या मार्गावरील वाहतुकीची कसोटी लागणार असल्याचे चित्र आहे.
रेल्वेच्या या मेगाब्लॉकमध्ये सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेस, सह्य़ाद्री एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस, कोयना एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस, इंद्रायणी एक्स्प्रेस या गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. या गाडय़ा मुंबईत जाणार नसल्याने त्यांच्या परतीच्या फेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे पंढरपूर-सीएसटी, सोलापूर-सीएसटी, लातूर-सीएसटी एक्स्प्रेस, नागरकोईल-सीएसटी एक्स्प्रेस, सीएसटी-चेन्नई एक्स्प्रेस या गाडय़ाही रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्याकडे येणाऱ्या सीएसटी-लातूर, सीएसटी-सोलापूर, सीएसटी-विजापूर, सीएसटी-शिर्डी, सीएसटी-नागरकोईल एक्स्प्रेस, सीएसटी-चेन्नई एक्स्प्रेस, सीएसटी-भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस या गाडय़ाही धावणार नाहीत. रविवारी एकही रेल्वे मुंबईकडे जाणार नसल्याने साहाजिकच त्याचा भार रस्ते वाहतुकीवर येणार आहे. मुंबईत जावे लागणाऱ्यां रेल्वे प्रवाशांना इतर वाहनांचा पर्याय स्वीकारावा लागणार आहे. पुणे स्टेशन स्थानकावरून रविवारी सकाळपासूनच जादा बसगाडय़ा सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी शंभर जादा गाडय़ांचे नियोजन करण्यात आले आहे.