पर्यटकांची दिवाळीच्या सुट्टीत भटकंती; पर्यटन महामंडळाची निवासस्थाने ८५ टक्के आरक्षित|eighty five percent reserved mtdc resort tourist diwali vacation pune | Loksatta

पर्यटकांची दिवाळीच्या सुट्टीत भटकंती; पर्यटन महामंडळाची निवासस्थाने ८५ टक्के आरक्षित

यंदा करोना संसर्ग कमी असल्याने दिवाळी सुटीनिमित्त पुणेकरांनी बाहेरगावी जाण्यास पसंती दिली असल्याचे महामंडळाच्या निवासस्थांमधील आरक्षणावरून स्पष्ट झाले आहे.

पर्यटकांची दिवाळीच्या सुट्टीत भटकंती; पर्यटन महामंडळाची निवासस्थाने ८५ टक्के आरक्षित
संग्रहित छायाचित्र

करोनाचा प्रादुर्भाव असल्याने आणि विविध निर्बंधांमुळे गेल्या दोन वर्षांपासून घरातच कोंडल्या गेलेल्या पर्यटकांनी यंदा दिवाळी सुट्टीनिमित्त भटकंतीला पसंती दिली आहे. यंदाच्या दिवाळी सुट्टीनिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची (महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमटीडीसी) पुणे विभागातील निवासस्थाने ८५ टक्के आरक्षित झाली आहेत. शनिवार-रविवारला लागून दिवाळी आल्याने यंदा पर्यटकांनी निसर्गाच्या सान्निध्यात जाण्यास पसंती दिली आहे.

गेल्या दोन वर्षांमध्ये दिवाळीमध्येही करोना संसर्गामुळे राज्य सरकारकडून विविध निर्बंध लावण्यात आले होते. परिणामी पर्यटकांना इच्छा असूनही भटकंती करता आली नव्हती. यंदा करोना संसर्ग कमी असल्याने दिवाळी सुट्टीनिमित्त पुणेकरांनी बाहेरगावी जाण्यास पसंती दिली असल्याचे महामंडळाच्या निवासस्थांमधील आरक्षणावरून स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा : विश्लेषण : टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान धोकादायक संघ… पण जगज्जेतेपदाची संधी किती?

याबाबत बोलताना पर्यटन महामंडळ पुणे विभागाच्या प्रादेशिक व्यवस्थापक मौसमी कोसे म्हणाल्या, ‘करोना निर्बंधांमुळे गेल्या दोन वर्षांपासून पर्यटक बाहेर पडू शकले नाहीत. त्यामुळे यंदा उन्हाळी सुट्टीनंतर दिवाळी सुट्टयांमध्येही पर्यटकांनी भटकंतीला पसंती दिली आहे. पुणे विभागातील कार्ले, भाजे, तारकर्ली, हरिहरेश्वर, दापोली, महाबळेश्वर, पानशेत, भीमाशंकर, माळशेज, नाणेघाट अशा विविध ठिकाणांना पर्यटकांची नेहमीच पसंती असते. त्यामुळे पुणे विभागातील महामंडळाची निवासस्थाने ८५ टक्के आरक्षित झाली आहेत. यंदाच्या दिवाळीत पर्यटकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.’

हेही वाचा : पुण्यात सराफी दुकानावर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चोरट्यांकडून गोळीबार

दरम्यान, महामंडळाच्या पुणे विभागात महाबळेश्वर, पानशेत, माथेरान, माळशेज, कार्ला, भीमाशंकर, सिंहगड, अक्कलकोट आणि कोयनानगर अशी नऊ निवासस्थाने आहेत. त्यापैकी काही कारणांनी सिंहगड आणि अक्कलकोट ही निवासस्थाने सुरू नाहीत. उर्वरित सातही निवासस्थानी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात आरक्षण केले आहे.

डेक्कन ओडिसी रेल्वे सुरू

देशातील प्रसिद्ध शाही रेल्वेपैकी एक असलेल्या डेक्कन ओडिसी ही रेल्वेही आता सुरू झाली आहे. करोना निर्बंधांमुळे ही रेल्वे बंद करण्यात आली होती. ही रेल्वे आता सुरू करण्यात आली आहे, असे कोसे यांनी सांगितले. भारतात नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हा पर्यटकांच्या दृष्टीने पर्यटनास उत्तम काळ मानला जातो. भारतीय रेल्वे आणि पर्यटन महामंडळ यांच्यातील करारानुसार ही रेल्वे राज्यात आठ दिवस आणि सात रात्र प्रवास करते. यामध्ये मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अजंठा, कोल्हापूर, गोवा, सिंधुदुर्ग असा प्रवास करते.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-10-2022 at 10:14 IST
Next Story
पुण्यात सराफी दुकानावर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चोरट्यांकडून गोळीबार