हे काही परीक्षण नाही. हा केवळ अनुभव. जे पाहिलं त्याचा. पाहताना जे जे मनात आलं ते. पाहण्यापूर्वी आणि नंतर काय काय वाटलं ते. आणि, पाहण्यापूर्वी व नंतर बरंच काही वाटलेलं असूनही दैनंदिन व्यवहारांत ते उमटू न देता तो व्यवहार कसा सुरू राहिला, तेही. प्रस्तावना मला वाटतं पुरे.

‘एका नटाचा मृत्यू’ या नावाचं ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी लिहिलेलं नाटक, त्यांच्या पुढच्या पिढीतला अतुल पेठे दिग्दर्शित करतो आणि त्याच्या पुढच्या पिढीतला अभय महाजन रंगमंचावर सादर करतो आहे, तर ते कसं असेल, या एवढ्याच उत्सुकतेपोटी पाहिलं. आता इतक्याशाच पूर्वतयारीवर हे नाटक पाहायला जावं का? का त्यासाठी एलकुंचवार, पेठे आणि अभय यांच्या आधीच्या कामांची उजळणी वगैरे करून, एक परिप्रेक्ष्य वगैरे तयार करून जावं किंवा कसे वगैरे अकादमिक प्रश्न पडावेत, अशी काही लेखक, दिग्दर्शक वा नटाचीही अपेक्षा नसावी. आपण जो रोज आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक जाणिवांच्या प्रतीनुसार जगण्याचा किंवा जिवंत राहण्याचा किंवा फक्त अस्तित्व टिकविण्याचा रियाझ करत असतो, तो यासाठी पुरेसा ठरावा.

तर, ६५ मिनिटांचं हे नाटक पाहायला नाट्यगृहाबाहेर रांग लावली, तेव्हा नाटकात काय असेल वगैरे आडाखे बांधले नाहीत. रांगेत किती ओळखीचे-बिनओळखीचे चेहरे दिसताहेत, तेवढे फक्त हेरले. यापैकी नाटकानंतर कितींशी आपली भेट होईल, झाली तर काय बोलायचं, काय नाही बोलायचं, याचं स्क्रिप्ट मनातल्या मनात तयार झालं. नाटकोत्तर भेटीगाठींवेळी निभवायच्या भूमिकांची तालीम! म्हणजे नाटक संपल्यावर नाटकाबद्दल कुणाशी काय बोलायचं, अशी. नाही कळलं नाटकातलं काहीच, तर सरळ कुणालाच न भेटता निघून जायचं. आपल्याला कळलंय ते खरंच बरोबर आहे का, अशी शंका असेल, तर आपले पत्ते न उघडता आधी समोरच्याचं ऐकून घ्यायचं, मग फट दिसली, की काही वाक्यं फेकायची. काहींशी नाटकाबद्दल काही बोलायचंच नाही. तर वगैरे वगैरे. नाट्यगृहात शिरेस्तोवर असा रियाझ झाला.

नाट्यगृहात शिरताना बराच अंधार होता. ते एक बरं झालं. आपले हावभाव शेजाऱ्याला दिसणार नाहीत. ती भूमिका आपली आपल्यापुरती. मिळालेल्या खुर्चीत पसरून, आक्रसून, ताठ, पोक काढून, शेजाऱ्याला स्पर्श न करता, कधी हाताची घडी, हात मोकळे, ओठांवरून जीभ, दात आवळून, श्वासांचं नियमन, हसण्याच्या जागा अशा कित्ती कित्ती भूमिका नाटक पाहता पाहता करायच्या असतात. दाट अंधार बरा पडतो त्यामुळे. प्रेक्षक स्थिरस्थावर झाल्यावर काही मिनिटांत नाटक सुरू झालं. नाटक जसं सुरू झालं, तसं मी आणि ‘माझ्यातल्या मी’चा संवाद सुरू झाला.

मी : ते बघ, मागून वरच्या बाजूनं एक तिरपा प्रकाशझोत उघड्यावागड्या, स्वत:ला बोळं झालेल्या फडक्यासारख्या गुंडाळून ठेवलेल्या एका शरीरावर पडलाय. ही रंगभाषा नवीन आहे. आधी पाहिलं होतं असं? म्हणजे आपण जी मराठी नाटकं पाहतो त्यात?

माझ्यातला मी : बहुदा नाही. ‘वेटिंग फॉर गोदो’च्या सुरुवातीला होतं का असं काही दृश्य? ते दोघांचं मिळून झालेलं गाठोडं होतं, हा बोळाच वाटतोय. शहरांतल्या रस्त्यांवर, पुलांवर, गाड्यांवर, गाड्यांत, बसमध्ये, वाहते, थबकलेले असे किती तरी बोळे दिसतात. तसाच हा. बाजूला टाकायच्या ऐवजी मध्यात पडलेला, आपल्या मनाच्या प्रतिबिंबासारखा.

मी : आता ती आकृती हलतीये, घशातून आवाज काढतीये, स्वत:ला सोडवतीये, आकारात यायचा प्रयत्न करतीये, बाबा-आई शब्द फुटू लागतायेत… नट बोलू लागला वाटतं.

माझ्यातला मी : तो बोलतोय त्यापेक्षा त्याच्या शरीराची जी हालचाल आहे, ती त्रासदायक आहे. स्वत:ला असं सोलवटून काढून स्वत:कडे पाहणं त्रासदायकच असतं म्हणा.

मी : आता तो मोकळा झाला, जन्मला बहुदा. प्रथमच, की नव्यानं? संवाद म्हणू लागला. नट म्हणून असण्याचे, नट म्हणून जगण्याचे, भूमिकांत शिरण्याचे, भूमिकांतून बाहेर पडण्याचे, सर्व काही तो दिग्दर्शकाशी, त्याची सहअभिनेत्री, प्रेमिका, जोडीदार, स्नेही जी काही असेल, तिच्याशी. ‘भूमिकेत शिरायला सांगून मला त्या नव्या आत्म्याचा त्रास सहन करायला लावलास, वर स्वत: नामानिराळा राहिलास,’ असं आता तो दिग्दर्शकाला म्हणतोय. त्याला बोल लावतोय आणि दिग्दर्शकानं त्याला स्वत:ला पाहण्यासाठी आरसा म्हणून आपला वापर केला की काय, म्हणून मुग्ध्यात पडतोय. सहअभिनेत्रीबाबतही तसंच. तिचं मिरविणं नकली, दिखावा, तरी मनात असूया! मला मिरवायला आवडतं, पण आवडून घ्यायचं नाहीये, अशा मुग्ध्यात परत दिसणारा आरसा. दिवे, पडदे, रंगमंचाचे कोपरे, संगीत, ध्वनिमुद्रित आवाज अशा सगळ्याची नवी रंगभाषा, त्या नटाच्या जाणिवेला आणि नेणिवेलाही दृग्गोचर करणारी… काय असावं हे?

माझ्यातला मी : आपल्या आत डोकावून पाहिल्यावर दिसतं ते बहुदा. स्वत्वाचं, अहंकाराचं, असूयेचं, प्रेमाचं, मायेचं, रागाचं, विषादाचं आणि कसकसचं नागडं करून दाखविलेलं अस्तित्व.

नाटक संपलं, सगळे बाहेर पडले. भेटले फारसे कुणीच नाहीत. विचारात होते? सुन्न होते? झोपाळलेले होते? काहीच नव्हते? माहीत नाही. ओळखीच्या एका चेहऱ्याशी नाटकाबद्दल काहीच न बोलता संवाद झाला. कित्ती छान भूमिका आपली. पार पडली एकदाची. गाडीवरून परतताना मात्र अपरिहार्य परीक्षा… आपल्याच आकलनाची.

मी : काय कळलं तुला? म्हणजे काही कळलं तरी का नाटक? का एलकुंचवार, अतुल पेठे या नावांची फक्त दडपणं आली? त्या अभय महाजनचं तरी कौतुक करशील की नाही! आणि, प्रकाशयोजना, रंगभूषा यांचंही! वेगळी रंगभाषा पाहायची सवय नाही, की जगणं एकसुरी झालंय?

माझ्यातला मी : मला इतकंच कळलं, की नाटकात, जगण्यात चोख भूमिका बजावायची. आणि पडलाच प्रश्न कधी त्या नटासारखा – ‘या सगळ्यात मी कुठंय?’ असा, तर स्वत:ला सोलवटून काढायची तयारी ठेवायची. एका नटाचा मृत्यू, दुसऱ्याचा जन्म…

siddharth.kelkar@expressindia.com