पुणे : ज्येष्ठ साहित्यिक-नाटककार महेश एलकुंचवारलिखित आणि अतुल पेठे दिग्दर्शित ‘एका नटाचा मृत्यू’ या नाटकाची मुंबई येथील ‘पृथ्वी नाट्यमहोत्सव’ आणि बंगळुरू येथील ‘हब्बा नाट्यमहोत्सव’ या देशातील दोन महत्त्वाच्या नाट्यमहोत्सवांमध्ये निवड झाली आहे. ‘नाटकघर’ आणि ‘द बॉक्स’ यांची संयुक्त निर्मिती असलेल्या या नाटकात अभय महाजन या कलाकाराची मध्यवर्ती भूमिका आहे. प्रदीप वैद्य यांची प्रकाशयोजना असून नेपथ्य श्याम भूतकर आणि कुशल महंत यांचे आहे.

आपण नेमके कोण आणि कसे आहोत, आपल्या जगण्याचा अर्थ काय, आपल्याभोवती विणलेल्या नात्यांचे गुंते कोणते आहेत आणि माणसाने जगताना चढवलेले विविध मुखवटे सोलून बघितले तर गाभ्याचे सत्य गवसेल का? असे प्रश्न विविध भूमिका करणाऱ्या एका नटाला पडलेले आहेत. जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यात मध्ये लटकलेल्या जीवनाचे रहस्याचा वेध घेणारे हे नाटक आहे. ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या नाट्य कारकिर्दीतील हे शेवटचे आणि अतिशय वेगळे नाटक आहे.

वेगळ्या प्रकारची रंगभाषा असलेल्या या प्रयोगशील नाटकाची दखल पुणे आणि नागपूर येथील नाट्य रसिकांनी भरभरून घेतली आहेच. पण, मुंबई आणि बंगळुरू येथील नामांकित नाट्यमहोत्सवात त्याचा अंतर्भाव करणे हे मराठी रंगभूमीला अभिमानास्पद आहे. मुंबईतील पृथ्वी थिएटर येथे ६ नोव्हेंबर रोजी आणि बंगलोर येथे जानेवारी २०२७ मध्ये ‘एका नटाचा मृत्यू’ नाटकाचे प्रयोग होणार आहेत. पुण्यातील ‘द बाॅक्स’ येथे २४ आणि २५ ऑक्टोबर रोजी या नाटकाचे तीन प्रयोग होणार आहेत.

पृथ्वी थिएटर हे मुंबईतील जुहू येथील एक नाट्यगृह आणि ना-नफा, ना-तोटा तत्त्वावर चालणारी कला संस्था आहे. हिंदी रंगभूमीला प्रोत्साहन देण्यासाठी १९७८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचा उगम ज्येष्ठ अभिनेते पृथ्वीराज कपूर यांनी १९४४ मध्ये स्थापन केलेल्या पृथ्वी थिएटर्स या फिरत्या नाट्यसंस्थेत आहे.

‘हब्बा’ हा मूळ कन्नड भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ उत्सव किंवा सण असा होतो. कर्नाटकात विशेषतः बेंगळुरूमध्ये या नावाने अनेक मोठे कला, संस्कृती आणि नाट्य महोत्सव आयोजित केले जातात. हा बेंगळुरूचा सर्वात मोठा वार्षिक कला आणि सांस्कृतिक महोत्सव आहे. यामध्ये नाट्य, नृत्य, संगीत, लोककला आणि साहित्याचा समावेश असतो. हा कलाप्रकार एखाद्या बंद सभागृहापुरता मर्यादित नसून, संपूर्ण शहरातील उद्याने, मेट्रो स्थानके आणि ऐतिहासिक वास्तूंमध्ये पथनाट्य व विविध नाटकांचे प्रयोग केले जातात. हब्बा नाट्यमहोत्सव १५ ते २४ जानेवारी २०२७ या कालावधीत आयोजित केला जाणार आहे.