पुण्यात पत्नीच्या नावे जमीन खरेदी; ४० कोटींचा भूखंड अवघ्या चार कोटींत
जमीन व्यवहारात ३० कोटींचे लाच प्रकरण तसेच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या घरातून दूरध्वनी आल्याच्या आरोपाने वादाच्या गर्तेत सापडलेले राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. पुण्यात औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) संपादित केलेली भोसरी येथील तीन एकर जमीन एकनाथ खडसे यांनी पत्नी व जावयाच्या नावाने खरेदी केल्याची बाब उघड झाली असून, याबाबतची कागदपत्रे बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी उजेडात आणली आहेत. तसेच ४० कोटींची जमीन खडसेंनी ३.७५ कोटींना खरेदी केली असून, ही खरेदी पूर्णपणे बेकायदा असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
भोसरी औद्योगिक वसाहतीमधील अब्बास रसुलभाई उकानी यांच्या मालकीची तीन एकर जागा एमआयडीसीने २५ वर्षांपूर्वी ताब्यात घेतली होती. ही जागा परत मिळावी म्हणून त्यांनी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती, मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावली. त्यानंतर उकानी यांनी महसूल विभागाकडे याबाबतचा दावा केला होता. तो प्रलंबित असताना खडसे यांनी उकानी यांच्याकडून २८ एप्रिल २०१६ रोजी ही जमीन खरेदी केली. पत्नी मंदाकिनी व जावई गिरीश चौधरी यांच्या नावाने हा व्यवहार झाला असल्याचे गावंडे यांनी सांगितले.
सद्य:स्थितीत संबंधित जमिनीची किंमत ४० कोटी रुपये असून, त्याचा ताबा एमआयडीसीकडे आहे. असे असतानाही खडसे यांनी परस्पर पत्नी व जावयाच्या नावे उकानी यांच्याकडून ही जमीन ३ कोटी ७५ लाख रुपयांना खरेदी केली. या व्यवहारासाठी १ कोटी ३७ लाखांचे मुद्रांक शुल्क भरण्यात आले. जमिनीचा ७/१२ एमआयडीसीच्या नावे असताना हवेली दुय्यम निबंधक कार्यालयाने केलेल्या या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराबाबतही गावंडे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जमिनीचे खरेदीखत, मुद्रांक शुल्क भरल्याची पावती, खरेदीदारांच्या स्वाक्षऱ्या, अंगठय़ाचे ठसे, एमआयडीसीच्या नावे असलेला ७/१२, उच्च न्यायालयातील याचिका आदी कागदपत्रही गावंडे यांनी उघड केली आहेत.

जमीन खरेदी बेकायदा असल्याचा आरोप चुकीचा आहे. या प्रकरणात सर्व व्यवहार कायदेशीररीत्या झाले आहेत. त्याची सर्व माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
एकनाथ खडसे, महसूलमंत्री

जमिनीच्या या प्रकरणाबाबत आमच्याकडे कोणतीही तक्रार नाही. ही जमीन संबंधित सेक्टरमध्ये येते का, याबाबत आता सांगता येणार नाही. या प्रकरणाची माहिती घेतली जाईल.’’
– अजित देशमुख, एमआयडीसी विभागीय अधिकारी