भाजपा आमदार आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आज पुण्यात पत्रकारपरिषदेत बोलतना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे. एकनाथ खडसेंचं मानसिक संतुलन बिघडल आहे, असं महाजन म्हणाले आहे. तसेच, राज्यात निर्माण झालेल्या वीज टंचाईच्या संकटावरून महाविकास आघाडी सरकारवर देखील टीका केली आहे. याशिवाय मशिंदींवर भोग्या संदर्भात देखील त्यांनी भाजपाची भूमिका मांडली आहे.

पत्रकारपरिषदेत बोलताना आमदार गिरीश महाजन म्हणाले की, “प्रत्येक पक्षाची स्वतंत्र भूमिका असते, आमची भूमिका आम्ही वेळोवेळी मांडलेली आहे. मशिदींवरील भोग्यांबाबत सर्वोच्च न्यायालायने अगोदरच निर्णय दिलेला आहे. आमची भूमिका याबाबतीत स्पष्ट आहे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आमची भूमिका मांडलेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने जी भूमिका घेतली तीच आमची भूमिका आहे. २००५ मध्ये सर्वोच्च न्यायालयानेच सांगितलेलं आहे की, ध्वनिप्रदूषण झालं नाही पाहिजे. आता या संदर्भात गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांची बैठक झाल्याची देखील माहिती समोर आली आहे, आता त्यांचा निर्णय आल्यावर आम्ही पाहू.”

एखाद्या ठिकाणी निवडून या आणि मग सांगा मी पक्ष मोठा केला –

तसेच, एकनाथ खडसेंवर निशाणा साधताना गिरीश महाजन यांनी सांगितले की, “मला निवडून येऊन सहा टर्म झाल्या आहेत. एकनाथ खडसेंना देखील सहा टर्म झाल्या आहेत. पण तरी मी पक्ष मोठा केला, मी पक्ष मोठा केला असं ते सांगतात. खडसेंना म्हणा तुम्ही आम्हाला मोठं केलं की पक्षाने तुम्हाला मोठं केलं. खडसे पक्षापासून वेगेळे झाले. त्यांच्या मतदार संघाचे जिथे ते स्वत: राहतात तिथली सात लोकांची ग्रामपंचायत देखील ते निवडून आणू शकत नाहीत. त्यांच्या मतदार संघातील मुक्ताईनगर नगरपालिका आहे, तिथे देखील भाजपाचा अध्यक्ष आहे. परवा झालेल्या निवडणुकीत देखील त्यांचा पराभव झाला. त्यांची मुलगी विधानसभा निवडणुकीला उभी राहिली, तर ती देखील पडली. एवढी मोठं मोठी पदं तुमची लायकी नसताना तुम्हाला दिली ना? आता तुम्ही पक्ष सोडून गेलात, एखाद्या ठिकाणी बोंब पाडा निवडून या आणि मग सांगा मी पक्ष मोठा केला, मी पक्ष मोठा केला. स्वत:चीच पाठ स्वत:च्या हाताने थोपटून घ्यायची आणि काहीतर बोलायचं. मी अगोदरच सांगितलं आहे की त्यांचं थोडं संतुलन बिघडलेलं आहे. मी त्यांना जेवढं ओळखतो तेवढं कोणी ओळखत नाही. परंतु मला त्यांच्याबद्दल फार काही बोलयाचं नाही.”

वीजकेंद्र बंद ठेवण्यामागे दलाली हेच कारण –

याचबरोबर वीज टंचाईवरून महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना, “राज्यातील वीज टंचाईच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर आम्ही ही पत्रकारपरिषद बोलावली आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून विजेची मोठी समस्या या राज्यात निर्माण झालेली आहे. अगोदर समस्या निर्माण करायची आणि त्यातून जनतेच्या डोळ्यात अश्रू आणायचे मग ते पुसण्याचं काम करायचं. अशाप्रकारे महाविकास आघाडी शेतकरी, उद्योजक आणि सर्वसामान्य माणसाला छळण्याचं काम करत आहे. मग सहानुभूतीसाठी यावर कोळशाकडे बोट दाखवायचं, केंद्र सरकारकडे बोट दाखवायचं. आपण जर माहिती घेतली तर कोळशाअभावी कुठलही वीज केंद्र आज बंद नाही. कोळशाचा साठा आजही पूर्णक्षमतेने वीज केंद्र चालतील एवढा आहे. परंतु ढिसाळ कारभार आणि नियोजनचा अभाव दिसून येत आहे. आज विजेची कमाल मागणी असताना, वीज केंद्र बंद ठेवण्यात आलेली आहेत, त्याची देखभाल, दुरुस्ती सुरू आहे मात्र हे सगळं विजेची किमान मागणी असतानाच करायला हवं होतं. जाणीवपूर्व ही वीजकेंद्र बंद ठेवली गेली आहेत आणि त्यामागचं कारण हे दलालीचं आहे. जास्त दराने वीज खरेदी करायची, वीज टंचाईचं नाटक उभं करायचं आणि त्यातून दलाली मिळवायची. असा एकमेव टक्केवारीचा कार्यक्रम या महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुरू आहे. केंद्र सरकारने आता मर्यादा टाकलेल्या आहेत की, तुम्हाला यापेक्षा जास्त दराने वीज खरेदी करता येणार नाही. म्हणून जास्तीत वीज खरेदी करायची आणि दलाली मिळवण्याचा प्रकार सुरू आहे.” असं गिरीश महाजन म्हणाले.

“कोळशाची टंचाई सांगायची, जास्त दराने कोळसा खरेदी करायचा आणि त्यातही दलाली करायची. आज विजेच्या अभावी शेतीचं नुकसान होतंय, लोकाचे हाल सुरू आहेत. शेतीसाठी दोन तास देखील वीज मिळत नाही. उद्योजकांचे उद्योग संकटात आले आहेत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे सगळी जनता मेटाकुटीस आली आहे.” असा देखील गिरीश महाजन यांनी यावेळी आरोप केला.