पुणे : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले पुण्यातील संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे यांना सरकारी सेवेत सामावून घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री आणि नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना दिले आहेत.
जगदाळे यांच्या नियुक्तीची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना केल्या आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसात आसावरी जगदाळे यांना महापालिकेच्या सेवेत रुजू होता येणार आहे. गेल्या वर्षी एप्रिल मध्ये पहलगाम येथे दहशतवादी संघटनेने केलेल्या गोळीबारात पुण्यातील संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला होता. हल्ला करताना दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळीबार केला होता.
पहलगाम हल्ल्यानंतर या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात येऊन जगदाळे कुटुंबीयांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे आणि आसावरी जगदाळे यांचे सांत्वन करून या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, यासाठी आसावरीला शासकीय सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते.
राज्य सरकारने राज्य शासनाने नोकरीचे आश्वासन दिले होते. मात्र, नोकरीच्या प्रस्तावाला मंत्रालयातून अद्यापही मंजुरी नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटण्याचाही प्रयत्न केला. मात्र, भेट होऊ शकली नाही,’ अशी व्यथा दोन दिवसांपूर्वी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या संतोष जगदाळे यांच्या कन्या आसावरी यांनी मांडली होती. याबाबतचे वृत्त ‘ लोकसत्ता ‘ ने प्रसिद्ध करत सरकारच्या कारभारावर बोट ठेवले होते.
याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच उपमुख्यमंत्री आणि राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. जगदाळे यांच्या कन्या आसावरी यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या शिक्षणाला समक्ष असे पद महापालिकेच्या सेवेत निर्माण करावे आणि तेथे त्यांना रुजू करून घ्यावे अशा सूचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या.
राज्य शासन सहानुभूतीपूर्वक हा निर्णय घेत असून विशेष बाब म्हणून तिच्या नेमणुकीला मंजुरी देण्यात येईल असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दूरध्वनी करून सूचना देण्यात आल्याच्या माहितीला महापालिका आयुक्त राम यांनी दुजोरा दिला. आसावरी जगदाळे यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याची प्रकिया लवकरच पूर्ण केली जाणार आहे, असेही महापालिका आयुक्त राम यांनी स्पष्ट केले.
खासदार मेधा कुलकर्णी यांचा पाठपुरावा
‘पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा, जगदाळे यांची कन्या आसावरी यांना शासकीय नोकरीत रुजू करून घ्यावे,’ अशी मागणी काही दिवसांपूर्वी राज्यसभा खासदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली. त्या पार्श्वभूमीवर आसावरी यांच्याशी संवाद साधला असता, त्या म्हणाल्या, ‘महापालिकेत नोकरी देण्यासंदर्भातील प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून गेल्या वर्षी जुलै महिन्यात मंत्रालयात पाठविण्यात आला. मंत्रालयातून अद्यापही या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली नाही. या संदर्भात मंत्रालयाच्या स्तरावरही पाठपुरावा करण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.
