पुणे : राज्यातील रस्त्यांची अवस्था या पावसाळ्यात अतिशय खराब झाली आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ते हेच कळेनासे झाले आहे. यामुळे वाहन चालकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. तसेच वाहतूक कोंडीची समस्याही वाढली आहे. यावर तातडीचा उपाय म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्ते दुरुस्तीचा ‘नवा पॅटर्न’ आणला आहे. ठाणे, मुंबई- गोवा महामार्ग, नाशिक रोडनंतर पुण्यात पोचलेल्या पॅटर्नची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी होणाऱ्या विविध ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून सद्य:स्थितीची माहिती घेतली. त्यावेळी त्यांनी जिओपॉलिमर टेक्नोपॅच, एम-६० हार्डनरचा वापर करून खड्डे बुजवण्याचे काम आणि पावसाने खराब झालेल्या रस्त्यांवर थेट कॉक्रिट कास्टिंग केलेले पॅनेल बसवण्याच्या कामाची पाहणी केली. छोट्या खड्ड्यामध्ये पॅच तर रस्ता अतिशय खराब व मोठे खड्डे असलेल्या ठिकाणी थेट काँक्रीट पॅनेल अंथरण्यात येत आहेत. या नवीन तंत्रज्ञानामुळे कमी वेळात रस्ता पूर्ववत करून त्यावरून अवजड वाहने सोडणे शक्य होत आहे.

चाकण-शिक्रापूर मार्गावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा मोठा फटका उद्योजकांना बसत आहे. पावसाळ्यात पारंपरिक डांबरीकरण टिकत नसल्याने यावर मात करण्यासाठी जिओ पॉलिमर टेक्नोपॅच आणि एम-६ आरएमसी विथ हार्डनरचा वापर केला जात आहे. जिओ पॉलिमर मिश्रणाला अर्धा ते पाऊण तासातच सेट होत असल्याने खड्डे भरल्यानंतर तातडीने वाहतूक सुरू करणे शक्य होत आहे. तसेच सर्वाधिक खराब झालेल्या ठिकाणी प्री-कास्ट पॅनेल ट्रेलरद्वारे आणून थेट बसवण्यात येत आहेत.

फायदे काय आहेत?

याबाबत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने खड्डे बुजवण्याचा प्रयोग सर्वप्रथम ठाण्यात करण्यात आला. त्यानंतर नाशिक रोड, मुंबई-गोवा महामार्ग आणि आता पुण्यात चाकणमध्ये हा प्रयोग करण्यात येत आहे. पावसाळ्यात रस्त्यावरील खड्डे डांबराच्या मदतीने बुजवता येत नाहीत, कारण डांबराला पाणी लागल्यानंतर ते जास्त काळ टिकत नाही. अशा परिस्थितीत जिओपॉलिमर टेक्नोपॅच आणि एम ६० आरएमसी विथ हार्डनर यांच्या मदतीने खड्डे बुजवण्यात येत आहेत. या नवीन पद्धतीने खड्डे बुजवण्यात आल्यानंतर केवळ अर्ध्या तासात त्यावरून वाहतूक सुरू करता येते. यामुळे जास्त काळ रस्ते दुरुस्तीसाठी वाहतूक रोखून करावी लागत नाही. तसेच वाहतूक कोंडीची समस्या ही तातडीने कमी होण्यास कमी मदत होते.