scorecardresearch

स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेचे दागिने लंपास; कात्रज भागातील घटना

स्वस्तात सोन्याचे बिस्कीट देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेकडील ६० हजारांचे दागिने दोन महिलांनी लांबविल्याची घटना कात्रज पीएमपी थांब्यावर घडली.

स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेचे दागिने लंपास; कात्रज भागातील घटना
संग्रहित छायाचित्र

पुणे : स्वस्तात सोन्याचे बिस्कीट देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेकडील ६० हजारांचे दागिने दोन महिलांनी लांबविल्याची घटना कात्रज पीएमपी थांब्यावर घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिलेची विवाहित मुलगी हडपसर भागात राहायला आहे. ज्येष्ठ महिला मुलीला भेटण्यासाठी पीएमपी बसने हडपसरकडे जात होत्या. कात्रज चौकातील पीएमपी थांब्यावर ज्येष्ठ महिला थांबल्या होत्या त्या वेळी दोन महिला थांब्यावर आल्या आणि त्यांनी महिलेशी गप्पा मारण्याचा बहाणा केला. महिलेला स्वस्तात सोने देण्याची बतावणी दोघींनी केली. दोन महिलांनी ज्येष्ठ महिलेकडील मंगळसूत्र आणि सोन्याची अंगठी असा ६० हजारांचा ऐवज काढून घेतला. त्या बदल्यात महिलेला सोन्यासारख्या दिसणाऱ्या पिवळसर धातूची पट्टी दिली. महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून दोघी पसार झाल्या. ज्येष्ठ महिलेने सराफी पेढीत जाऊन सोन्यासारख्या दिसणाऱ्या धातुच्या पट्टीची तपासणी केली. तेव्हा फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. सहायक पोलीस निरीक्षक जे. डी.धावटे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या