पुणे : पिंपरी-चिंचवड येथील ७४ वर्षीय वृद्धाचा आवाज हळूहळू बसू लागला. त्यासोबतच त्यांच्या मानेला उजव्या बाजूला वेदनारहित गाठ आली. त्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले. पुढे बोलणेच कठीण झाल्याने त्यांनी डॉक्टरांकडे धाव घेतली. त्या वेळी त्यांना चौथ्या टप्प्यातील घशाच्या कर्करोगाचे निदान झाले. मात्र, डॉक्टरांनी केलेल्या प्रगत उपचारामुळे या वृद्धाने कर्करोगावर मात करून आवाजही पुन्हा मिळविला आहे.
या वृद्ध रुग्णाला पूर्वी तंबाखूचे व्यसन होते; परंतु, इतर कोणताही गंभीर आजार नव्हता. त्यांचा आवाज हळूहळू बसू लागला. त्याच वेळी मानेच्या उजव्या बाजूला वेदनारहित गाठ दिसून आली. सुरुवातीला त्यांनी याकडे फारसे लक्ष दिले नाही. मात्र, तीन महिन्यांत त्यांचा आवाज अधिकच कमजोर झाला. त्यांना मोठ्याने बोलणे कठीण झाले आणि साध्या संभाषणानेही थकवा येऊ लागला. त्यामुळे त्यांनी वैद्यकीय मदत घेण्याचा निर्णय घेतला.
याबाबत कर्करोगतज्ज्ञ डॉ. गौरव जसवाल म्हणाले, की हा रुग्ण आमच्याकडे आला त्या वेळी सतत आवाज बसत होता, गिळताना त्रास होत होता आणि मानेवर स्पष्ट सूज दिसत होती. तपासणीत उजव्या बाजूच्या पायरीफॉर्म सायनस भागात कर्करोग आढळला. ही गाठ स्वरयंत्रापर्यंत पसरली होती आणि जवळच्या लसिका ग्रंथीमध्येही कर्करोग आढळून आला.
मात्र, तो इतर अवयवांपर्यंत पसरलेला नव्हता. या स्थितीमुळे अवयव जतन करणाऱ्या उपचारांची योजना आखणे शक्य झाले. रुग्णावर आधुनिक हेलिकल टोमोथेरपी आणि त्यासोबत सिस्प्लॅटिन केमोथेरपी करण्याचे ठरविले. आमचे प्रमुख उद्दिष्ट हे स्वरयंत्राचे जतन करणे आणि कर्करोगावर संपूर्ण नियंत्रण मिळवत रुग्णाचा गेलेला आवाज परत मिळवणे हा होता.
उपचारानंतर सुमारे १६ आठवड्यांत रुग्णाचा आवाज कर्करोग होण्यापूर्वीपेक्षा स्पष्ट झाला. सध्या रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत आहे आणि तो व्यवस्थित बोलू शकतो. उपचारास विलंब झाला असता, तर रुग्णाला त्याचा आवाज कायमचा गमवावा लागला असता. त्याला गिळताना अडचण किंवा श्वसनासंबंधी गंभीर समस्येचा सामना करावा लागला असता.
रुग्णाला उपचारानंतरच्या काळात रुग्णाला मऊ व द्रव आहार, गिळण्याचे व्यायाम, मौखिक स्वच्छता, तिखट व कडक पदार्थांचे सेवन टाळणे, जबडा व मान यांचा व्यायाम, धूम्रपान व मद्यपान टाळणे, वजन नियंत्रित राखणे, भरपूर पाणी पिणे, नियमित हालचाल आणि वैद्यकीय तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असे डॉ. जसवाल यांनी सांगितले.
मी कधी पुन्हा नीट बोलू शकेन, असे वाटत नव्हते. आज मी माझ्या कुटुंबीयांशी आणि मित्रांशी आधीसारखा गप्पा मारू शकतो, याचा खूप आनंद आहे. माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग मला पुन्हा मिळाल्याचा आनंद आहे. – रुग्ण.
