आपला भारत देश १२० कोटी लोकांचा असून पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री, मोरारजी देसाई, चंद्रशेखर आदी पंतप्रधान होऊन गेले. परंतु त्यांनी कधी एकाचा विचार केला नाही, मीच पंतप्रधान अशी हिटलरशाही या देशाला परवडणारी नाही. जिथे हुकूमशाही आली ते देश टिकले नाहीत. गोध्रा हत्याकांड तर मानवतेला काळिमा लावणारी घटना आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजप-सेना महायुतीला रोखा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जेजुरी येथे केले.
सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर माजी आमदार अशोक टेकवडे, विजय कोलते, काँग्रेसचे नेते चंदुकाका जगताप, सुदाम इंगळे आदी उपस्थित होते.
अजित पवार यांनी नरेंद्र मोदी, गोपीनाथ मुंडे, उद्धव व राज ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. गोपीनाथ मुंडे यांनी गुडघ्याला बािशग बांधले आहे. ते सध्या पदे वाटून लोकांना भुलवत आहेत. सत्ता आल्यानंतर कोणाला कॅबिनेट मंत्रिपद, तर कोणाला उपपंतप्रधान अशा पदांचे वाटप त्यांनी सुरू केले आहे. ते म्हणतात,‘ अजितने माझे घर फोडले’ मी काय दरोडेखोर आहे का? स्वत:चा पुतण्या तुम्हाला सांभाळता येत नाही, त्यात माझा काय दोष? माझ्यावर ते खालच्या पातळीवर येऊन आरोप करीत आहेत.येत्या १४ तारखेला बीडमध्ये जाऊन त्यांच्या आरोपांचा समाचार घेणार आहे,’’ असे अजित पवार म्हणाले.
राज व उद्धव या ठाकरे बंधूंमध्ये तेलकट वडे, चिकन सूप कोणी दिले यावरुन वाद वाढलेत. गाडीतून उद्धवला मी दवाखान्यात नेले. हे काय जाहीर सभेत बोलण्याचे विषय आहेत? घरगुती वाद घालणारी ही मंडळी आपला देश कसा सांभाळणार? असा सवाल त्यांनी केला. आमदार विजय शिवतारे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, तुमचा आमदार कधी काय बरळेल सांगता येत नाही.
आपचे उमेदवार म्हणतात, की अजित पवारची दहशत आहे. मी कडक आहे. माझ्या पक्षातील लोकांचे चुकले तर कडक शब्दांत बोलतो, पण इतरांना कसा बोलेन, असे ते म्हणाले.