शिवसेना-भाजप युती तुटल्यास…

युती खरोखरच तुटली, तर पुण्यातील सहाही जागांवर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला उमेदवार उभे करावे लागतील आणि त्यासाठी आधी उमेदवार शोधावे लागतील.

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे नेते युती करण्याबाबत जो घोळ घालत आहे त्याचा अंतिम निकाल काय लागेल या बाबत सध्या दोन्ही पक्षांमध्ये पूर्ण संभ्रम असला, तरी युती तुटलीच तर काय होईल, अशीही चर्चा आता सुरू झाली आहे. पंचवीस वर्षांची युती खरोखरच तुटली, तर दोन्ही पक्षांपुढे पुण्यात प्रबळ उमेदवार उभे करण्याचे आव्हान तातडीने उभे राहील. त्यातही कसबा, पर्वती आणि शिवाजीनगरमध्ये उमेदवाराचा शोध घेण्याचे आव्हान शिवसेनेपुढे असेल.
निवडणुका आल्या की, युतीची चर्चा नेहमीच ताणली जाते. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून वाद होतात. प्रसंगी कडक भाषा वापरली जाते. काही वादग्रस्त जागांवर मैत्रीपूर्ण लढतीची भाषा होते आणि अखेर युती अभेद्य राहील, अशी घोषणा होऊन दोन्ही पक्ष युती म्हणून मैदानात उतरतात. येत्या विधानसभेसाठीही हाच क्रम राहणार अशी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना अद्याप आशा असली, तरी नेत्यांची विधाने ऐकून दोन्ही पक्षांमध्ये आता संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे युती खरोखरच तुटली, तर पुण्यातील सहाही जागांवर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला उमेदवार उभे करावे लागतील आणि त्यासाठी आधी उमेदवार शोधावे लागतील.
कसबा
कसबा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा परंपरागत बालेकिल्ला आहे आणि गिरीश बापट येथून पाचव्यांदा निवडणूक रिंगणात येण्यासाठी उत्सुक आहेत. या मतदारसंघात महापालिकेचे नऊ प्रभाग येतात आणि त्यातील १८ नगरसेवकांपैकी सहा नगरसेवक भाजपचे आहेत. कसब्यात शिवसेनेचा एकही नगरसेवक नाही. त्यामुळे कसबा लढवण्याची वेळ शिवसेनेवर आली, तर शिवसेनेला आधी सक्षम उमेदवार शोधावा लागेल, अशी परिस्थिती आहे.
कोथरूड
युतीच्या जागावाटपात कोथरूड मतदारसंघ शिवेसनेकडे असला, तरी पूर्वीच्या शिवाजीनगर आणि नव्याने तयार झालेल्या कोथरूडवर भाजपनेच सातत्याने दावा केला आहे. हा मतदारसंघ भाजपकडे असला पाहिजे, अशी त्या पक्षाची अनेक वर्षांची इच्छा असल्यामुळे युती तुटल्यास इथे भाजपला निवडणूक लढणे आणि उमेदवार मिळणे जड जाणार नाही. या मतदारसंघातील १८ नगरसेवकांपैकी चार शिवसेनेचे आणि तीन भाजपचे आहेत.
शिवाजीनगर
काँग्रेसचे विद्यमान आमदार विनायक निम्हण यांचा भाजपप्रवेश थांबल्यामुळे आता भाजप इथून कोणाला उमेदवारी देणार याबाबत पक्षात चर्चा सुरू आहे आणि त्या बरोबरच दोन्ही पक्ष वेगळे लढल्यास शिवसेनेचा उमेदवार कोण अशीही चर्चा सुरू झाली आहे. या मतदारसंघात भाजपच्या दोन नगरसेविका आहेत, तर शिवसेनेचा एकही नगरसेवक इथे नाही. एकूणात भाजपच्याच उमेदवाराची निश्चिती नाही आणि युती तुटल्यास शिवसेनेचा उमेदवार शोध अशी परिस्थिती सध्या आहे.
पर्वती
युतीच्या वाटपात भाजपकडे असलेल्या या मतदारसंघात राजकीय प्राबल्यही भाजपचेच आहे. पर्वतीत येणाऱ्या दहा प्रभागांतील २० पैकी १० नगरसेवक भाजपचे आहेत आणि ते सात प्रभागांमधून निवडून आले आहेत. इथे एक नगरसेवक शिवसेनेचा आहे. त्यामुळे हा मतदारसंघ लढवण्याची वेळ शिवसेनेवर आली, तर पक्षाला मोठी तयारी करून लढतीला उतरावे लागेल. मात्र, अद्याप सेनेची तशी तयारी झालेली नाही.
कॅन्टोन्मेंट
युतीच्या जागावाटपात शिवसेनेकडे असलेल्या या मतदारसंघातून यावेळी शिवसेनाच लढणार का, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ आरपीआयसाठी सोडला जाण्याची शक्यता आहे. या विधानसभा मतदारसंघात भाजप आणि सेनेचा प्रत्येकी एक नगरसेवक आहे आणि युती तुटल्यास विद्यमान आमदार, काँग्रेसचे रमेश बागवे यांच्याशी लढत देणारा तगडा उमेदवार दोन्ही पक्षांना शोधावा लागणार आहे. युती तुटून भाजप-आरपीआय युती झाल्यास ही जागा भाजप आरपीआयला देईल अशीही शक्यता आहे.
वडगावशेरी
इथे युतीची मुख्य लढत विद्यमान आमदार, राष्ट्रवादीचे बापू पठारे यांच्याशी आहे. शिवसेनेकडे हा मतदारसंघ असला, तरी दोन्ही पक्ष वेगळे झाल्यास भाजपचीही इथे तयारी आहेच. या मतदारसंघातील २२ पैकी दोन नगरसेवक शिवसेनेचे आहेत आणि भाजपचा एक नगरसेवक आहे. शिवसेनेची तयारी इथे आधीपासून सुरू आहे; पण युती तुटल्यास भाजपचीही यंत्रणा इथे तयार आहेच.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Election bjp shivsena break

ताज्या बातम्या