राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बारामतीत राष्ट्रपती, पंतप्रधान, अनेक केंद्रीय मंत्री, देशविदेशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती यांनी हजेरी लावली आहे. मात्र, पवारांच्या पक्षाच्या विरोधात प्रचार करण्यासाठी खुद्द पंतप्रधान येत असल्याची गुरुवारी (९ ऑक्टोबर) दुसरीच वेळ असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा बारामती मतदारसंघात जळोची येथे होत आहे. शरद पवार यांनी अलीकडेच मोदी यांच्यावर केलेल्या कडवट टीकेच्या पाश्र्वभूमीवर मोदी हे पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल नेमके काय बोलतात, याबाबत कमालीची उत्सुकता आहे.
बारामती येथे शरद पवार यांच्याविरोधात प्रचारसभा घेण्यासाठी यापूर्वी पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी आल्या होत्या. त्यांनी १९८५ साली ही सभा घेतली होती. त्या वेळी पवार समाजवादी काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर बारामती येथे प्रत्यक्ष पंतप्रधान कधीही प्रचारासाठी आलेले नाहीत. आता पंतप्रधान म्हणून मोदी तेथे येत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत मोदी आणि पवार यांनी एकमेकांवर फारशी टीका केली नव्हती. मात्र, या निवडणुकीत मोदी यांनी राष्ट्रवादीचा उल्लेख ‘भ्रष्टाचारवादी’ असा केला, तर पवार यांनी, ‘मोदी हे पंतप्रधान असूनही महाराष्ट्रात इतक्या मोठय़ा प्रमाणात प्रचारसभा घेत आहेत. त्यावरून त्यांचे प्राधान्य कशाला आहे हे स्पष्ट होते,’ अशी टीका केली होती. याशिवाय गुजरातमध्ये आत्महत्या होत असल्याने मोदींना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असेही म्हटले होते.
पवार यांनी मोदी यांच्यावर टीका केल्याने भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया आल्या होत्या. त्याचबरोबर शिवसेना आणि मनसे यांनीसुद्धा मोदी यांनाच लक्ष्य केल्यामुळे भाजपमध्ये संताप आहे. आता खुद्द पवारांच्या बालेकिल्ल्यात येत असल्याने ते शरद पवार  अजित पवार आणि राष्ट्रवादीबाबत काय बोलणार, याबाबत उत्सुकता आहे.
बारामती मतदारसंघात अजित पवार यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार म्हणून बाळासाहेब गावडे उभे आहेत. बारामती हा पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला मानला जातो. लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना या विधानसभा मतदारसंघानेच हात दिला होता. त्यांना येथून एक लाख ४२ हजार इतके मताधिक्य मिळाल्यानेच त्या विजयी होऊ शकल्या होत्या. आता शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे हे राज्यभर प्रचारासाठी फिरत आहेत. मात्र, त्यांचे अन्य सर्व कुटुंबीय प्रचारात उतरले आहेत. ते सातत्याने मतदारांच्या संपर्कात आहेत.
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी निवडणुकीच्या तोंडावरच मोठे आंदोलन झाले. त्यावरून धनगर समाजात नाराजी आहे. बारामती मतदारसंघात धनगर समाजाची मोठी संख्या आहे. भाजपचे उमेदवार गावडे हे याच समाजाचे आहेत. त्यामुळे मोदी यांच्या सभेमुळे या मतदारसंघात नेमके काय बदल होतात याबाबतही उत्सुकता आहे.