परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करणाऱ्या मुलांसारखी स्थिती उमेदवारांची झाली आहे. प्रचाराला कमी वेळ मिळाल्यामुळे या परीक्षेत पास होण्यासाठी आवश्यक असलेल्या मतांचा हिशोब करून, कठीण भाग सध्या ऑप्शनला टाकला जातो आहे. ज्या भागातील मतदार खात्रीने आपले आहेत, त्याच भागात प्रचार करण्याकडे उमेदवारांचा कल आहे.
उमेदवारी निश्चित झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रचाराला उमेदवारांच्या हाती या वेळी वेळ कमी राहिला. प्रचाराला हातात सगळे मिळून जेमतेम दहा दिवस मिळाले. त्यातही मोठय़ा नेत्यांच्या सभा असल्या, की ते दिवस मतदारसंघातील गाठी-भेटी आणि प्रत्यक्ष प्रचारातून वजाच करावे लागतात. अनेक वर्षे निवडणुका लढवणारे, या सगळ्या प्रक्रियेत चांगल्या मुरलेल्या उमेदवारांबरोबरच नव्याने, पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे उमेदवारही बरेच आहेत. त्यातच सर्व पक्ष स्वतंत्र लढत असल्यामुळे स्पर्धाही वाढली, पुरेशा प्रमाणात कार्यकर्त्यांची वानवा आणि वाढलेली मतदारांची संख्या. आदल्या दिवशीपर्यंत एका पक्षात कार्यकर्ता म्हणून काम करणारे अनेक जण दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी घेऊन लढत आहेत. त्यामुळे एकेका मताच्या हिशोबात कार्यकर्ते आणि उमेदवार गुंतले आहेत.
आपल्याला आवश्यक असलेल्या मतांचा हिशोब करून आपल्या पक्षाचा किंवा हक्काचा मतदार असलेल्या भागातच प्रचार करण्याकडे उमेदवारांनी सर्वाधिक भर दिला आहे. आपल्या पक्षाला यापूर्वीच्या निवडणुकीत कोणत्या भागात चांगले यश मिळाले. नवे मतदार किती आहेत. जातीनिहाय लोकसंख्येचा विचार करून कोणत्या भागातील किती मतदारांचा कल आपल्याकडे असू शकतो. मतदारसंघातील कोणती गावे किंवा रहिवासी सोसायटी आपल्याकडे पूर्णपणे वळू शकेल. दुसऱ्या पक्षातून आलेल्या उमेदवाराला त्याच्या नावावर किती मते मिळतील, आधीच्या पक्षातील किती मतदार आपल्याकडे वळतील, आपल्या पारंपरिक मतदारांपैकी किती कायम राहतील, असा सगळा हिशोब केला जात आहे. आपले खात्रीचे मतदार, थोडय़ा प्रचाराने आपल्याकडे वळू शकतील असे मतदार आणि आपल्याला नक्की मत देणार नाहीत असे मतदार अशी वर्गवारी करून जे खात्रीचे मतदार आहेत, त्या ठिकाणीच प्रचार करण्याकडे सध्या उमेदवारांचा कल आहे. बाकीच्या भागांमध्ये रिक्षा, पत्रके अशा माध्यमातून जुजबी प्रचार केला जात आहे.

‘आम्ही आमच्या मतदारसंघातील मतदारांची तीन टप्प्यांमध्ये विभागणी केली आहे. प्रचार सगळ्या मतदारसंघात करणार. मात्र, अर्थातच जे आमचे हक्काचे मतदार आहेत किंवा जे नवे मतदार आमच्याकडे वळू शकतील, त्या भागांतच आम्ही प्रचार करत आहोत. मात्र, जसे आमचे पारंपरिक मतदार असतात, तसेच ते दुसऱ्या पक्षांचेही असतात. त्या भागांमध्येही प्रचार करणार. मात्र, अधिक लक्ष हे सध्या आमच्या हक्काच्या मतदरांकडे दिले जात आहे.’
– अनुपमा लिमये, भाजप, माजी नगरसेविका
.
‘ज्या भागांत आमचे नगरसेवक आहेत किंवा ज्या भागांत यापूर्वीच्या निवडणुकीला आमचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. त्या भागांत प्रचाराचा वेग वाढवला आहे. या भागांमध्ये नगरसेवक, उमेदवार घरोघरी भेटी देऊन आणि कोपरासभा, मेळावे यांच्या माध्यमातून प्रचार करत आहेत.’
– बाळासाहेब शेडगे, मनसे