इच्छुकांना उमेदवार यादीची प्रतीक्षा

भारतीय जनता पक्ष-शिवसेनेची तुटलेली युती, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील लटकलेली आघाडीची चर्चा, त्यातून लांबणीवर पडलेली उमेदवारी यादी आदी कारणांमुळे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यानंतरही शुक्रवारी पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज निवडणूक विभागाकडे दाखल झाला नाही. उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर येत्या सोमवारपासून (३० जानेवारी) आणि आघाडीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यास वेग येणार असून त्यानंतरच राजकीय वातावरण खऱ्या अर्थाने तापण्यास सुरुवात होईल.

महापालिका निवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारपासून (२७ जानेवारी) प्रारंभ झाला. येत्या तीन फेब्रुवारीपर्यंत ही मुदत राहणार आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून डिसेंबर महिन्यातच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यावेळी युती-आघाडी होणार की नाही, याबाबत कोणतीही चर्चा नव्हती. मात्र स्वबळावर लढावे लागेल, ही शक्यता गृहीत धरून मुलाखतींचा कार्यक्रम घेण्यात आला होता. उमेदवार यादी जाहीर करण्याची वेळ आली असताना युती-आघाडीबाबत सेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात चर्चा सुरू झाली. त्यामुळे उमेदवार याद्या जाहीर करणे लांबणीवर पडले. होणार, नाही होणार, अशा चर्चेत सापडलेला हा खेळ उमेदवारी अर्ज दाखल करण्यास एक दिवस बाकी राहिला असतानाही सुरू राहिला. त्यामुळे सावध पवित्रा घेऊनच सोमवारपासून याद्या जाहीर होण्याची शक्यता आहे.