सोशल मीडियाची धूम सर्वानी लोकसभेला आलेल्या मोदी लाटेद्वारे अनुभवली असल्याने त्याचे प्रतििबब आता विधानसभा निवडणुकीतही दिसणार आहे. आपले काम मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशातून बहुतांश उमेदवारांनी माहितीपटाचा मार्ग पसंत केला आहे. आपल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्याचा आलेख आगामी दहा दिवसांत मतदारांपर्यंत नेत प्रत्यक्षाहून प्रतिमा उजळ करण्यावर उमेदवारांचा भर आहे.
भिंती रंगविणे, उमेदवाराच्या कार्याचा परिचय करून देणारी हँडबिलांचे वाटप, ‘ताई-माई-अक्का, विचार करा पक्का’ अशा घोषणा देत फिरणाऱ्या रिक्षा ही पारंपरिक प्रचारक पद्धती आता हायटेक जमान्यात बाद ठरली आहे. आधुनिक प्रचार पद्धतीचा वापर प्रभावीपणे करता येतो हे नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये दाखवून दिले आहे. त्याचेच अनुकरण आता विधानसभा निवडणुकीमध्ये केले जात आहे. शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्यानंतर अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आधुनिक प्रचार माध्यमांचा उपयोग करून घेतला जात आहे.
उमेदवारांनी आपल्या कार्याची माहिती मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी माहितीपटाची निर्मिती करण्यावर भर दिला आहे. शहरातील विविध स्टुडिओमध्ये माहितीपट तयार करण्यासाठी उमेदवारांचे कार्यकर्ते झटत असून १० ते १२ मिनिटे कालावधीच्या माहितीपटासाठी अगदी १५ लाख रुपये खर्च करण्याकडेही कल दिसतो. माहितीपट उत्तम व्हावा यासाठी मतदारसंघातील ‘सेलिब्रिटी’ आपल्या उमेदवाराच्या कामाची माहिती करून देतात. एवढेच नव्हे तर, वेळोवेळी त्या राजकीय कार्यकर्त्यांने संबंधित ‘सेलिब्रिटी’शी केलेल्या वार्तालापाची दृश्येही सहभागी करून घेण्यात आली आहेत. त्याचबरोबरीने ‘व्हॉट्स-अ‍ॅप’वरून शेअर करण्यासाठी उमेदवाराच्या कार्याची माहिती देणाऱ्या दोन-तीन मिनिटांच्या वेगवेगळ्या ‘क्लिप्स’ तयार करण्यात आल्या आहेत.
मल्हार प्रॉडक्शनचे संचालक महेश लिमये म्हणाले, लोकसभा निवडणुकीपर्यंत दृक-श्राव्य माध्यमाची ताकद काय आहे याची पुरेशी जाणीव राजकीय नेत्यांना नव्हती. मोदी यांनी या माध्यमाचा प्रभावीपणे वापर केला. एवढेच नव्हे तर केंद्रामध्ये भाजपचे सरकार आले. या निवडणुकीमध्ये काही उमेदवारांनी पक्ष बदलले असल्याने त्याविषयीची माहिती आणि त्यांचे कार्य मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहितीपटाचे सर्वच उमेदवारांना आकर्षण वाटत आहे.