पुण्यात येत्या आठवडय़ात भाजप, शिवसेना, मनसेच्या जाहीर सभांची रांग लागलेली असताना काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र पुण्याकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहेत. राज्यातील निवडणुकांचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असताना काँग्रेसच्या नेत्यांच्या सभा अद्यापही निश्चित झालेल्या नाहीत.
निवडणुकांच्या प्रचारासाठी आता अवघे पाच दिवस शिल्लक आहेत. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या सभा पुण्यात होणार आहेत. शिवसेना, भाजप, मनसे यांच्या नेत्यांच्या सभा होत आहेत. अनेकांच्या सभा गेल्या चार दिवसांमध्ये झाल्याही आहेत. मात्र, काँग्रेसच्या नेत्यांनी आणि स्टार प्रचारकांनी मात्र पुण्याकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. नाही म्हणायला नारायण राणे यांच्या दोन सभा पुण्यात झाल्या. मात्र, एकाही राष्ट्रीय नेत्याची जाहीर सभा पुण्यात होणार नसल्याचेच संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिले आहेत. अजूनही पुण्यातील सभांबाबतचे वेळापत्रक निश्चित झाले नसल्याचे ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.