राज्यभरातील अनेक लोकसभा मतदारसंघांत महायुती कागदावरच राहिली आहे, अशी टीका काँग्रेसचे संपर्कमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी निगडीत केली. महायुती व शेकापला मदत होईल, अशी भूमिका काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेऊ नये, आघाडी धर्म पाळावा अन्यथा खडय़ासारखे बाजूला काढू, अशी तंबी त्यांनी दिली.
निगडी प्राधिकरणातील सावरकर मंडळात काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, तेव्हा ते बोलत होते. रामराजे निंबाळकर, आझम पानसरे, भाऊसाहेब भोईर, सचिन साठे, योगेश बहल, मंगला कदम, विनोद नढे आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, शिवसेनेच्या विरोधात भाजपचे तर भाजपच्या विरोधात शिवसेनेचे कार्यकर्ते काम करत आहेत. मनसे व भाजपची सेनेच्या विरोधात छुपी युती आहे. खासदारकी मिळाल्याने खूष असलेल्या रामदास आठवले यांना कोणाचेही घेणं-देणं नाही. राजू शेट्टी मतदारसंघात अडकून पडलेत. अशा परिस्थितीत, आघाडीला २००९ पेक्षा जास्त जागा मिळणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आघाडी धर्म पाळत आहेत. विश्वजित कदमांसाठी राष्ट्रवादी हिरिरीने भाग घेत असल्याने मावळात काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल नार्वेकर यांच्या प्रचारात आघाडी घ्यावी. काही कार्यकर्ते विरोधात काम करत आहेत, असे चालणार नाही. आघाडी धर्म न पाळल्यास खडय़ासारखे बाजूला टाकू. शरद पवार यांनी सांगवीत राष्ट्रवादीची भूमिका योग्य त्या शब्दात स्पष्ट केली आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी कोणीही काम करू नये. राजकारण हा व्यवसाय झाला असून सामान्य कार्यकर्ता राजकारणात येऊ शकत नाही, अशी परिस्थिती झाली आहे. सत्तेसाठी नको तर तत्त्वासाठी राजकारण हवे आहे, असे पाटील म्हणाले.
एक्झिट पोल बोगस
वाहिन्यांवर दाखवण्यात येणारे सव्र्हेक्षण बोगस असल्याची टीका हर्षवर्धन पाटील यांनी केली. १८-२० लाखांचे मतदारसंघ असतानाच दोन हजार नागरिकांचा कौल घेऊन त्यावर मत तयार करणाऱ्या या सर्वेक्षणाद्वारे नरेंद्र मोदी ‘२७२’चा जादूई आकडा कसा गाठतील, हे दाखवण्यासाठी वाहिन्यांचा आटापिटा सुरू आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.