विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी जाहीर होणार असल्यामुळे शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राजकीयदृष्टय़ा चुरशीचे असणाऱ्या मतदार संघांवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. हडपसर, भोसरी, निगडीसह शहरातील दहा ठिकाणे पोलिसांनी संवेदनशील ठरविली असून त्या ठिकाणांवर अधिक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्तात पोलीस गुंतलेले होते. गुरुवारी मतदान झाल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. मात्र, निवडणुकीचा शेवटचा टप्पा रविवारी पार पडणार आहे. शहरात दोन ठिकाणी असलेल्या मतमोजणीच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्या पोलीस उपायुक्तांना चोख बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याच्या मदतीला अठरा सहायक पोलीस आयुक्त आणि शीघ्र कृती दलाचे पोलीस राहणार आहेत. तसेच, निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षाचे कार्यालय, उमेदवाराचे घराच्या परिसरात पोलीस गस्त घालणार आहेत. गुन्हे शाखेची दहा पथकेही शहरात बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत, अशी माहिती विशेष शाखेच्या सहायक पोलीस आयुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी दिली.
निकालानंतर शहरात विजयी मिरवणुका काढण्यास मनाईचा आदेश पोलीस सहआयुक्तांनी काढला आहे. त्याबरोबरच जमाव बंदीचा आदेश लागू आहे. त्यामुळे जल्लोष करताना कार्यकर्त्यांनी भान राखावे आणि कायदा सुव्यस्थेचा बाधा येणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.