विधानसभा निवडणुकीचा प्रचार करताना पुणे शहरातील उमेदवारांना विविध कारणांसाठी जो खर्च येणार आहे, त्यासाठी निश्चित करून देण्यात आलेले दर पाहता काही गोष्टींसाठी स्वस्ताई आणि काही गोष्टींसाठी महागाई असा प्रकार झाला आहे. पुण्यात दहा रुपयात पोहे, तसेच उपमा आणि साबुदाण्याची खिचडी मिळते असे सरकारी दर सांगत असले, तरी बाजारातील अनुभव मात्र वेगळाच आहे.
निवडणूक प्रचारात उमेदवारांचा अनेकविध बाबींवर खर्च होत असतो. मुख्यत: जाहीर सभा, चौक सभा, पदयात्रा, रॅली, रिक्षातून होणारा प्रचार याबरोबरच नाश्ता, भोजन, चहापाणी आदी बाबींवर उमेदवार खर्च करतात. या खर्चाचा तपशील उमेदवाराला रोजच्या रोज निवडणूक कार्यालयाकडे द्यावा लागतो. या प्रत्येक गोष्टीवर किती खर्च होतो, त्याचे दर प्रशासनाकडून निश्चित करून देण्यात आले असले, तरी दरांमधील विविधता वास्तवात नसल्याचा अनुभव उमेदवारांना येत आहे. त्यामुळे होणारा खर्च आणि निश्चित झालेले दर यांचा मेळ सध्या उमेदवारांचे प्रतिनिधी घालत आहेत.
शासकीय प्रक्रियेनुसार वर्किंग लंचचा दर (पुरी/पराठे, दोन भाज्या, लोणचे, सॅलड, मसालेभात) ९० रुपये निश्चित करण्यात आला आहे आणि मिष्टान्नासह या जेवणाचा दर १०५ रुपये असा निश्चित करण्यात आला आहे. प्रत्यक्षात यापेक्षाही अधिक दर बाजारात असल्याचा अनुभव आहे. या जेवणाचा दर जसा अधिक धरण्यात आला आहे, तशाच पद्धतीने अन्यही काही खाद्यपदार्थाचे बाजारातील दर व शासकीय दर यात मोठीच तफावत आहे. शासकीय पत्रकानुसार पोह्य़ांचा दर १० रुपये तसेच उपीटाचा दरही १० रुपये धरण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र या पदार्थासाठी किमान १५ ते २० रुपये प्लेट असा दर आहे. उपवासाची साबुदाण्याची खिचडी देखील १० रुपये प्लेट या दराने धरण्यात आली आहे. मात्र, खिचडीची प्लेट ३० रुपयांखाली कोणत्याही हॉटेलमध्ये मिळत नाही.
शासनाने निश्चित केलेला चहाचा दर पाच रुपये असा आहे. तसेच कॉफीचा दरही पाच रुपये असा निश्चित करण्यात आला आहे. मात्र पाच रुपयाला पुण्यात कटिंग चहा देखील मिळत नाही. चहासाठी किमान १० ते १५ रुपये असा दर आहे, तर कॉफीचा दर २० रुपयांच्या पुढे आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळीही दरांबाबत उमेदवारांनी आक्षेप घेतले होते. त्या वेळी काही दर वाजवीपेक्षा जादा धरण्यात आले होते. विशेषत: निवडणूक कचेरीसाठी जे भाडे आकारले जाते, त्याबाबत शासकीय दर व बाजारातील दर यात मोठी तफावत होती.