पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप उमेदवारांसाठी तर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या उमेदवारांसाठी शहरात प्रचारसभा घेतल्याने दोन्हीकडे चैतन्य पसरले आहे. त्याचवेळी, वरिष्ठ नेत्यांनी पाठ फिरवल्याने शहरातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये चिंता दिसून येत आहे.
भाजप उमेदवार एकनाथ पवार, लक्ष्मण जगताप तसेच चंद्रकांता सोनकांबळे यांच्या प्रचारासाठी मोदी यांची पिंपरीतील एचए कंपनीच्या मैदानावर सभा झाली, त्यास विक्रमी गर्दी लाभली. त्याचप्रमाणे, शिवसेनेचे राहुल कलाटे, सुलभा उबाळे, गौतम चाबुकस्वार यांच्यासाठी उद्धव यांनी सांगवी व भोसरीत सभा घेतल्या. मोदी यांनी आपल्या भाषणात विकासाच्या मुद्दय़ावर जोर दिला. तर, ठाकरे यांनी आपल्या भाषणात मोदी, अमित शहा, पवार यांच्यासह विरोधकांवर कडाडून टीका केली. भाजप-सेनेच्या सर्वोच्च नेत्यांच्या सभांमुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
दुसरीकडे, काँग्रेस व राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते शहराकडे फिरकलेले नाहीत. काँग्रेसकडून श्योराज वाल्मिकी, माणिकराव ठाकरे यांनी धावते दौरे केले. मात्र, अन्य नेत्यांच्या अद्याप सभा झालेल्या नाहीत. त्याचप्रमाणे, अजितदादांचा एक दिवसाचा धावता दौरा वगळता राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी पक्षाच्या नेत्यांच्या सभा झालेल्या नाहीत. प्रचाराची मुदत संपण्यासाठी अवघे तीन दिवस राहिले असल्याने उर्वरित काळात कोणी प्रचारासाठी येईल, अशी आशा धूसर वाटू लागल्याने दोन्ही काँग्रेस उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.