शहर पोलीस दलातील पाच हजार पोलीस कर्मचारी टपाली मतदान करणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी टपाली मतदान आणि इलेक्शन डय़ुटी सर्टिफिकेटच्या माध्यमातून अडीच हजार पोलीस व अधिकाऱ्यांनी मतदान केले होते. त्यात या वेळी आणखी अडीच हजारांची भर पडली आहे.
शहर पोलीस दलात सुमारे नऊ हजार पोलीस कर्मचारी आहेत. मात्र, यातील बऱ्याच पोलीस कर्मचाऱ्यांची नावे कोठे आहेत हे न सापडल्यामुळे व इतर प्रशासकीय यंत्रणेमुळे लोकसभा निवडणुकीच्या वेळी फक्त अडीच हजार पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता आला होता. या वेळी जास्त पोलिसांना मतदान करता यावे यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून प्रयत्न करण्यात आले. त्यानुसार विधानसभा निवडणुकीत शहर पोलीस दलातील पाच हजार पोलीस कर्मचारी व अधिकारी मतदानाचा हक्क बजावणार आहे. हे सर्व जण टपाली मतदान करणार आहेत, असे मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त तुषार दोषी यांनी सांगितले.