scorecardresearch

उद्यापासून निवडणूक प्रक्रिया ; राज्यभरातील ५८ हजार सहकारी संस्था

सरकारी विभागांतील अधिकाऱ्यांची नियुक्ती सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी मनुष्यबळ आवश्यक आहे

पुणे : करोनामुळे स्थगित केलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल १ एप्रिलपासून वाजणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे सहा टप्पे केले असून, पहिल्या तीन टप्प्यांतील ४१ हजार ४२२ सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे तसेच उर्वरित तीन टप्प्यांमधील १७ हजार १९४ सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये ३० सहकारी साखर कारखाने आणि ४५ सूतगिरण्यांचा समावेश आहे.

प्राधिकरणाने ३१ डिसेंबर २०२० अखेर मुदत संपलेल्या ४५ हजार ४०९ सहकारी संस्थांच्या सहा टप्प्यांमध्ये निवडणुका घेण्यासाठी जिल्हा निवडणूक आराखडा तयार केला आहे. २०२१ आणि २०२२ मधील अनुक्रमे १९ हजार ७५५ आणि १३ हजार ३२ सहकारी संस्था आहेत. निवडणूक आराखडय़ातील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील १७ हजार आणि तिसऱ्या टप्प्यातील नऊ हजार ९९; तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ मार्च २०२२ पर्यंत निवडणुकीस पात्र असलेल्या १५ हजार ३२० प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था, २४ हजार ४१९ बहुउद्देशीय सहकारी संस्था अशा ४१ हजार ४२२ सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश प्राधिकरणाने दिले आहेत. त्यापैकी २३ हजार ५६ सहकारी संस्थांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. उर्वरित सहकारी संस्थांच्या प्रारूप मतदार याद्या प्राप्त झाल्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित जिल्हा, तालुका आणि प्रभागाच्या सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

या सहकारी संस्थांबरोबरच आता चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या टप्प्यांतील १७ हजार १९४ सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया एक एप्रिलपासून सुरू होणार आहेत. त्यामध्ये अ-वर्गातील ८९ सहकारी संस्था असून, ३० सहकारी साखर कारखाने आणि ४५ सूतगिरण्यांचा समावेश असल्याची माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली.

क्षेत्रीय कार्यालयांना सूचना

सरकारी विभागांतील अधिकाऱ्यांची नियुक्ती सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी मनुष्यबळ आवश्यक आहे. त्यामुळे सहकार विभागाबरोबरच अन्य सरकारी विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. याबाबतच्या सूचना क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत, असे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी सांगितले.

२१ जिल्हा बँकांच्या निवडणुका

पूर्ण राज्यात ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका असून, त्यापैकी २१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत. राज्य सरकारने आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन नाशिक, सोलापूर, नागपूर आणि बुलढाणा या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणूक प्रक्रिया आहे त्या टप्प्यावर पुढे ढकलल्या आहेत. रायगड आणि जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची निवडणूक प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. गोंदिया, भंडारा, आणि चंद्रपूर या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकांची बाब न्यायप्रविष्ट आहे. वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे, असे प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Election process for cooperative society in maharashtra start tomorrow zws

ताज्या बातम्या