राज्यातील ३८०० सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया २० सप्टेंबरपासून

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ ऑगस्टपर्यंत स्थगित केल्या होत्या.

पुणे : करोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने तयारी सुरू के ली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ३८०० संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश प्राधिकरणाने मंगळवारी दिले. या संस्थांची निवडणूक प्रक्रिया २० सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. निवडणुकांचे सहा टप्पे पाडण्यात आले असून पहिल्या टप्प्यातील निवडणुका झाल्यानंतर उर्वरित टप्प्यांतील निवडणुका घेण्याबाबतचे आदेश प्राधिकरणाकडून प्रसृत के ले जाणार आहेत. मात्र, २५० पेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका होणार नसल्याचे प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ ऑगस्टपर्यंत स्थगित केल्या होत्या. स्थगितीला मुदतवाढ दिली नसल्याने पहिल्या टप्प्यातील ३८०० सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी आदेश प्रसृत के ले आहेत. प्राधिकरणाने सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी ‘जिल्हा निवडणूक आराखडा’ तयार के ला आहे. राज्यात डिसेंबर २०२० पर्यंत ४५ हजार ४०१ संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. त्यामध्ये चालू वर्षाच्या संस्थाच्या निवडणुकांची भर पडल्याने निवडणूक प्रलंबित संस्थांची संख्या ६५ हजारांवर पोहोचली आहे. पहिल्या टप्प्यातील संस्थांच्या निवडणुकांसाठी नामनिर्देशन प्रक्रिया सुरू झाली असलेल्या संस्था वगळून अन्य सहकारी संस्थांच्या प्रारूप आणि अंतिम मतदार याद्या ३१ ऑगस्ट २०२१ या अर्हता दिनांकावर नव्याने तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया २० सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ३८०० संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. या निवडणुकांमध्ये २५० पेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांचा समावेश नसून सहा टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. – यशवंत गिरी, सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Election process of 3800 co operative societies 20th september akp