निवडणुकीसाठीचा जाहीर प्रचार थंडावला आणि आता सुरू झाला आहे गुपचूप प्रचार.. मग या छुप्या प्रचाराचा धोका हुशारीने पेलणारे हक्काचे आणि मुठीत राहणारे कार्यकर्तेही हवेतच! मात्र, उमेदवारांसाठी हा काही जटिल प्रश्न राहिलेला नाही. आपल्या शिक्षणसंस्था, पतपेढय़ा, सहकारी बँकांमधील कर्मचाऱ्यांना उमेदवारांनी अगदी ‘हक्काने’ कामाला जुंपले आहे.
पुण्यातील काही उमेदवारांच्या शिक्षणसंस्था आहेत, बहुतेकांच्या पतपेढय़ा आहेत. त्यामुळे सोमवारी सायंकाळी जाहीर प्रचार बंद झाल्यानंतर उमेदवारांनी आपल्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांना कामाला लावले आहे. प्रामुख्याने चिठ्ठय़ा वाटणे, निवडणुकीच्या दिवशी कार्यकर्त्यांची बडदास्त ठेवणे, बुथवर बसणे अशी कामे या कर्मचाऱ्यांवर सर्रास सोपवली जात आहेत. यामध्ये शिक्षणसंस्थांमधील शिक्षकही अपवाद नाहीत. आपल्या संस्थेतील ‘नोकर’ असलेल्या या कर्मचारी आणि शिक्षकांना उमेदवारांनी ही नवी कामगिरी दिली आहे.
या उमेदवारांच्या शिक्षणसंस्थांमधील ज्या कर्मचारी आणि शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून सुटका मिळाली आहे, त्यांचा आनंद या उमेदवारांनी फारसा काही टिकू दिलेला नाही. यापेक्षा निवडणुकीचे काम परवडले असेही या कर्मचाऱ्यांना वाटू लागले आहे. या कर्मचारी आणि शिक्षकांची मतदानाच्या दिवशीची सुटीही कागदोपत्रीच राहणार आहे. कर्मचारी मनातून कोणत्याही पक्षाचा असो, उमेदवार म्हणून आपला संस्थाचालक त्याला पटो अथवा न पटो.. पण आपल्या संस्थाचालकाचा प्रचार मात्र करावाच लागतो आहे.
नोकऱ्याच धोक्यात येण्याची शक्यता असल्यामुळे विरोध करण्याचे धाडसही कर्मचाऱ्यांकडून दाखवण्यात येत नाही. प्रचार सुरू झाल्यापासूनच उमेदवारांनी काही कर्मचाऱ्यांना कामाला जुंपले होते. मात्र, आता जाहीर प्रचार थंडावल्यानंतर हे कर्मचारी उमेदवारांना हक्काचे वाटत आहेत.