चर्चेतील प्रभाग : प्रभाग क्रमांक- ८ इंद्रायणीनगर, भोसरीनगर
भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे या दिग्गजांची भोसरी-इंद्रायणीनगर प्रभागावरून राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप सरचिटणीस सारंग कामतेकर यांच्या उमेदवारीवरून जगताप-लांडगे यांच्यात झालेला संघर्ष, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करावा लागलेला हस्तक्षेप, त्यानंतर भाजपकडून इच्छुक असलेल्या तुषार सहाणे यांना शिवसेनेची उमेदवारी, राष्ट्रवादीत भोसरीकर विक्रांत लांडे यांच्या उमेदवारीचे ‘अतिक्रमण’ आदी घटनांमुळे प्रभागातील लढती लक्षवेधी ठरल्या आहेत.
[jwplayer zZz7idXw-1o30kmL6]
भोसरीचा इंद्रायणीनगर व मोशी प्राधिकरणाचा भाग एकत्र केलेल्या प्रभागात उच्चभ्रूंची वसाहत आहे. शिरूर, खेड, आंबेगाव, जुन्नर, संगमनेर भागातील रहिवासी मोठय़ा संख्येने आहेत. प्रभागातील बहुतांश उमेदवारीवरून ‘घरचा उपाशी आणि बाहेरचा तुपाशी’ असा काहीसा प्रकार झाल्याचे दिसून येते. कामतेकरांवरून भाजपमध्ये बराच काथ्याकूट झाला. विलास लांडे यांनी संजय वाबळे यांच्या भरवशावर स्वत:च्या मुलाला भोसरी सोडून इंद्रायणीनगरला आणले; तेव्हा कामतेकरांच्या उमेदवारीचा विषय नव्हता. लांडे-जगताप यांच्यातील मैत्रीमुळे ‘मॅचफिक्िंसग’ होईल आणि विक्रांत लांडे यांची निवडणूक सोपी होईल, असे गणित त्यांना ओळखून असणाऱ्यांनी मांडले होते. कामतेकरांनी अचानक या भागात तयारी सुरू केली व त्यांच्या उमेदवारीसाठी जगतापांनी शर्थीचे प्रयत्न केल्याने ‘फिक्िंसग’ची चर्चा थांबली. मात्र, तरीही संगनमत होणार, ही शंका कायम आहे. दुसरीकडे, आमदार लांडगे यांनी मात्र तुषार सहाने यांच्यासाठी भाजप नेतृत्वाकडे आग्रह धरला. कामतेकरांसाठी जगताप तर सहानेंसाठी लांडगे यांनी ‘फििल्डग’ लावली. उमेदवारीच्या मुद्दय़ावरून दोन्ही आमदारांमध्ये संघर्ष पेटला, तो मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला.
कामतेकरांनाच उमेदवारी देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यामुळे जगताप सुखावले तर लांडगे दुखावले. पुढे वेगवान घडामोडी होत सहाने शिवसेनेचे उमेदवार म्हणून िरगणात आले. सहाने यांना शिवसेनेची ताकद मिळाली असून लांडगे यांचे बळ त्यांच्या पाठिशी आहेच. तर, कामतेकरांना निवडून आणण्यासाठी जगतापांनी शक्ती पणाला लावली आहे. कोणत्याही परिस्थितीत मुलाला निवडून आणायचे असल्याने लांडे यांनी या भागात तळ ठोकला आहे. विक्रांत नव्हे विलास लांडेच उमेदवार असल्यासारखे वातावरण आहे. विक्रांत यांच्या उमेदवारीमुळे निष्ठावंतांवर अन्याय झाल्याची भावना आहे. गेल्या काही दिवसात राजकीय वातावरण तापलेले आहे. ‘सोशल मिडीया’वरील आरोप-प्रत्यारोपाने पातळी सोडल्याचे चित्र पुढे आहे. दृश्य स्वरूपात वेगळे दिसते. पडद्यामागे वेगळ्याच घडामोडी सुरू असल्यामुळे उत्कंठा शिगेला आहे.
- नगरसेविका सीमा सावळे (भाजप) विरुद्ध सविता झोंबाडे (राष्ट्रवादी) या पारंपरिक प्रतिस्पर्धी पुन्हा समोरासमोर
- सावळे पूर्वी शिवसेनेच्या, तर झोंबाडे काँग्रेसच्या उमेदवार होत्या
- सोनाली उदावंत भाजपच्या कार्यकर्त्यां होत्या, त्या आता राष्ट्रवादीच्या उमेदवार
- सुलोचना आहेर यांना डावलण्यात आले
- योगेश लोंढे पूर्वी सेनेकडून लढले होते. त्यांची पत्नी नम्रता यंदा भाजपच्या महिला गटाच्या उमेदवार
- भाजपचे विलास मडेगिरी व राष्ट्रवादीचे संजय वाबळे हे विद्यमान नगरसेवक आमने-सामने
[jwplayer K8f2NOFD-1o30kmL6]