निवडणुकांमध्ये उमेदवाराचे नाव व त्याचे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी अनेक प्रकारचे फंडे वापरले जातात. सध्याच्या डिजिटल व सोशल मीडियाच्या युगामध्ये निवडणुकांमधील प्रचाराच्या पारंपरिक अनेक गोष्टी मागे पडत गेल्या व प्रचाराच्या नवनव्या पद्धतीचा उदय झाला.. एकीकडे हे घडत असले, तरी गेल्या कित्येक निवडणुकांपासून प्रचारात असलेली रिक्षा मात्र कायम राहिली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीकडे रस्तोरस्ती विविध उमेदवारांच्या प्रचाराच्या रिक्षा फिरताना दिसत आहेत.
प्रचार फेऱ्या, दुचाकी रॅली, पदयात्रा आदींच्या माध्यमातून उमेदवार सध्या प्रत्यक्षात मतदारांसमोर जात आहेत. मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यावर भर दिला जात आहे. त्याचबरोबरीने विद्यमानांचे कार्यअहवाल व प्रतिनिधित्व करण्याची इच्छा असणाऱ्यांच्या भविष्यातील योजना तसेच आश्वासने पुस्तिकांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचविले जात आहेत. दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावरूनही जोरदार प्रचार केला जात आहे. मोठ-मोठय़ा गाडय़ांमध्ये एलईडी स्क्रीन लावून उमेदवारांचा सचित्र प्रचार करण्यात येत आहे. हे सर्व असताना प्रचारात सर्वात जुनी असलेली रिक्षाही अद्याप कायम आहे.
दोन्ही बाजूला पक्षाचे झेंडे, उमेदवाराचा फोटो नाव व चिन्ह असलेले फलक तसेच एका बाजूला लावलेला कर्णा.. असे रूप असलेली रिक्षा निवडणुकीत आजही धावताना दिसते. पूर्वी बहुतांश वेळेला रिक्षाच्या मागच्या बाजूला बसलेली व्यक्ती ध्वनिक्षेपकावरून उमेदवाराचा प्रचार करीत होती. त्याची जागा आता आधीच ध्वनिमुद्रित केलेल्या आवाजाने किंवा गाण्यांनी घेतली आहे. इतका बदल सोडला, तर रिक्षाच्या या प्रचारात फारसा बदल झाला नाही. एका रिक्षासाठी एका दिवसाला सुमारे हजार रुपये भाडे दिले जाते. वेळेनुसार या भाडय़ात वाढही केली जाते. त्यामुळे प्रचाराच्या कालावधीत संबंधित रिक्षा चालकालाही त्याचा चांगला फायदा मिळतो.
सध्याच्या प्रचारातही रिक्षाच्या वापराबाबत राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी संगितले, की उमेदवार प्रत्येक ठिकाणी रोजच जाऊ शकत नाही. उमेदवाराचे नाव व चिन्ह सतत मतदारांमध्ये चर्चेत व लक्षात राहावे, यासाठी रिक्षातील प्रचार प्रभावी ठरतो. बहुतांश ठिकाणी मोठी वाहने जाऊ शकत नाहीत. छोटय़ा गल्ल्यांमध्येही रिक्षा जाऊ शकते, त्यामुळे अशा भागातही रिक्षाच्या माध्यमातून प्रचार होऊ शकतो.