निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची सांगता झाली असली, तरी मतदानाच्या दिवशी जास्तीतजास्त मतदार बाहेर पडतील आणि मतदान करतील यासाठीचे प्रयत्न आता राजकीय पक्षांकडून सुरू आहेत. जाहीर प्रचाराची सांगता झाल्यानंतर आता मतदान वाढीसाठीची आखणी उमेदवार आणि पदाधिकारी करत आहेत.
लोकसभेसाठी पुण्यात १७ एप्रिल रोजी मतदान झाले होते. त्या वेळी मतदानात वाढ व्हावी यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांना यश आले आणि पुण्यात पासष्ट टक्के मतदान झाले होते. विधानसभेसाठीही मतदानाची टक्केवारी चांगली राहावी यासाठी उमेदवार व राजकीय पक्ष तयारीला लागले असून त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत.
नव्या पद्धतीचे व्होटर कार्ड
मतदारांना त्यांच्या चिठ्ठय़ा घरपोच देण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून केली जात असली, तरी त्या बरोबरच उमेदवारांनीही त्यांची यंत्रणा स्वतंत्रपणे उभी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदारांना मतदार चिठ्ठय़ा मिळाल्या नव्हत्या. तो अनुभव लक्षात घेऊन काही उमेदवारांनी बँकेच्या एटीएम कार्डप्रमाणे व्होटर कार्ड तयार केले आहे. प्रत्येक कुटुंबासाठी असे एक कार्ड दिले जात असून त्यावर मतदारांची नावे तसेच मतदार यादीचा तपशील, मतदान केंद्र, त्याचा पत्ता आदी तपशील देण्यात आला आहे. छापील स्लीपऐवजी हे नव्या पद्धतीचे कार्ड घरोघरी वाटले जात असल्यामुळे त्याबाबत मतदारांमध्येही उत्सुकता आहे. तसेच ते टिकाऊ असल्यामुळे मतदार ते जपून ठेवू शकतील.
मतदारांना घरी मतदार चिठ्ठी आली नसेल तर ती कोठे उपलब्ध होऊ शकेल याची माहिती देणारे एसएमसएस सध्या मोठय़ा संख्येने पाठवले जात आहेत. व्होटिंग स्लीप मिळाली का अशी विचारणा करणारे एसएसएस उमेदवार वा त्यांचे समर्थक पाठवत असून स्लीप मिळाली नसेल, तर नाव कोणत्या संकेतस्थळावर पाहता येईल याचीही माहिती मतदारांना पाठवली जात आहे.