निवडणूक प्रशासनाने एक जानेवारीपासून हाती घेतलेल्या मोहिमेमध्ये पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या संख्येमध्ये ६१ हजार एवढी वाढ झाली आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक १५ हजार मतदार वाढले असून राजकीय पक्षांनी आता कोथरूड येथील प्रचारासाठी वेगळी व्यूहरचना केली आहे. कोथरूडमधील मतदारसंख्या वाढली असली, तरी मतदारसंख्येचा विचार करता वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ हाच अव्वल ठरला आहे.
लोकसभेच्या मागील निवडणुकीमध्ये शहरातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये गेल्या काही निवडणुकांची पारंपरिक समीकरणे दिसून आली. शहरातील विधानसभा मतदारसंघांची फेररचना झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीत कोथरूड, पर्वती आणि कसबा पेठ या मतदारसंघांतून भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार अनिल शिरोळे यांना मताधिक्य मिळाले होते. तर, शिवाजीनगर, वडगावशेरी आणि पुणे कॅन्टोन्मेंट या तीन मतदारसंघांतून काँग्रेसचे उमेदवार सुरेश कलमाडी यांना मिळालेल्या दणदणीत मताधिक्याने त्यांचा विजय सुकर केला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्याचे प्रतििबंब उमटले. ज्या तीन मतदारसंघामध्ये शिरोळे यांना मताधिक्य मिळाले तेथून युतीचे तर ज्या मतदारसंघांतून कलमाडी यांना मताधिक्य मिळाले तेथे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे आमदार विजयी झाले.
लोकसभेच्या निवडणुकीसाठी आता या मतदारसंघांतील मतदारांच्या संख्येमध्येही बदल झाले आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार पुण्यामध्ये मतदारांच्या संख्येत ६१ हजार ७२ एवढी वाढ झाली आहे. कोथरूड मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे १५ हजार १७ मतदार वाढले आहेत. त्यापाठोपाठ वडगावशेरीमध्ये ११ हजार ५७९ मतदारांची भर पडली आहे. शिवाजीनगरमधून ९ हजार ३२३, पर्वतीमधून ९ हजार १६०, पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये ८ हजार ३२० आणि कसबा पेठ मतदारसंघातून ७ हजार ६७३ मतदारांची संख्या वाढली आहे.
ही बदलती समीकरणे ध्यानात घेऊन भाजप-शिवसेना-आरपीआय महायुती, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, मनसे या तीनही पक्षांबरोबरच नव्याने उदय झालेल्या आम आदमी पक्षालाही आगामी दहा दिवसांत आपल्या प्रचाराच्या रणनीतीमध्ये बदल करावा लागणार आहे. त्यामध्ये स्वाभाविकच कोथरूड मतदारसंघावर सर्वच उमेदवारांचे विशेष लक्ष असेल.
मतदारसंघ    मतदारांची संख्या

  • वडगावशेरी    ३ लाख ६७,४२४
  • पर्वती        ३ लाख १२,२४७
  • कोथरूड    ३ लाख १०,९०९
  • कॅन्टोन्मेंट    २ लाख ६५,६१७
  • शिवाजीनगर    २ लाख ६०,८५४
  • कसबा पेठ    २ लाख ५४,३८९