महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असा लौकिक असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आगामी शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोळ्यांसमोर ठेवून आरोप-प्रत्योरापाच्या फैरी झडत आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय पुण्यात असून, आगामी दोन साहित्य संमेलनांचे नियोजन करण्याचे अधिकार हेही या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले आहे. परिषदेचा केलेला कायापालट परिवर्तन उत्कर्ष आघाडीला तारणार, की प्रस्थापितांविरोधातील लाटेवर स्वार होत साहित्यसंवर्धन आघाडी बाजी मारणार, याचे उत्तर १५ मार्च रोजी मिळणार आहे.

निवडणुकीला यंदा विलक्षण महत्त्व प्राप्त होण्याला कारणही तसेच आहे. करोनाचे निमित्त पुढे करून परिषदेच्या विद्यमान कार्यकारिणीने निवडणुकीला सामोरे जाण्याचे टाळून मोजक्याच आजीव सभासदांच्या उपस्थितीत कार्यकारिणीला मुदतवाढ घेतली. त्याला आक्षेप घेण्यात आला असून, धर्मादाय आयुक्त, तसेच न्यायालयामध्येही दाद मागण्यात आली. त्याचप्रमाणे परिषदेची कार्यकारिणी बेकायदा असल्याचा दावा करून परिषदेवर प्रशासक नियुक्त करण्याची मागणीही जोर धरत होती. त्यामुळे साहित्यबाह्य शक्ती आणि त्यातही संघ आणि भाजपला संस्था ताब्यात घ्यायची असल्याने हे उद्योग सुरू असल्याची टीका विद्यमान पदाधिकारी प्रत्येक कार्यक्रमातील मनोगतातून करून मतदारांचे लक्ष वेधत आहेत. त्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी विद्यमान पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या परिवर्तन उत्कर्ष आघाडीच्या विरोधात योगेश सोमण यांच्या नेतृत्वाखाली साहित्य संवर्धन आघाडी रिंगणात उतरली आहे.

या निवडणुकीला विशेष महत्त्व येण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे पुण्यात असलेले कार्यालय. साहित्य महामंडळाच्या घटनेनुसार दर तीन वर्षांनी साहित्य महामंडळाचे कार्यालय मुंबई (मुंबई मराठी साहित्य संघ), पुणे (महाराष्ट्र साहित्य परिषद), छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा साहित्य परिषद) आणि नागपूर (विदर्भ साहित्य संघ) येथील घटक संस्थांकडे स्थलांतरित होते. त्यामुळे तीन वर्षांतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संयोजन करण्याची जबाबदारी ही संबंधित शहरातील संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे जाते. साहित्य महामंडळाचे कार्यालय पुण्यामध्ये आल्यानंतर गेल्याच महिन्यात ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्याला झाले. आता शंभरावे साहित्य संमेलन पुण्यात होणार असून, महाराष्ट्र साहित्य परिषद ही संस्थाच त्याची मुख्य संयोजक संस्था असेल. त्यामुळे या निवडणुकीत विजयी होणारे अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष हे प्रमुख पदाधिकारी आपोआप साहित्य महामंडळाचे पदाधिकारी असणार आहेत. ते आगामी शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासह पुढील साहित्य संमेलनांचे आयोजन करणार असल्याने यंदाची परिषदेची निवडणूक चुरशीची आणि प्रतिष्ठेचीही बनली आहे.
अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह, कोषाध्यक्ष, स्थानिक कार्यवाह (सात जागा) आणि पुणे जिल्हा प्रतिनिधी (तीन जागा) अशा १३ जागांवर निवडणूक होत आहे. निवडणूक प्रक्रियेचा सुगावा न लागल्याने उर्वरित महाराष्ट्रातून केवळ परिवर्तन उत्कर्ष आघाडीच्या उमेदवारांचेच अर्ज दाखल झाल्याने १८ जागांवरील उमेदवार ‘बिनविरोध’ निवडून आले आहेत. परिषदेचे १६ हजार ६०७ आजीव सभासद मतदार असून, त्यांना टपाल मतपत्रिका ५ ते १२ फेब्रुवारी या कालावधीत स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर एडीद्वारे पाठवाव्यात, जेणेकरून प्रत्येक मतदाराला वेळेत मतदानाचा अधिकार बजावता येईल, असे निर्देश उच्च न्यायालयाचे निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. टपाल मतपत्रिका स्वीकारण्याची अंतिम मुदत १३ मार्च रोजी सायंकाळी सातपर्यंत असून, मतमोजणी १५ मार्च रोजी होणार आहे.

‘सरकारी यंत्रणांचा वापर करून साहित्य संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे,’ असे महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सातारा येथे झालेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सांगितले, तेव्हा, ‘मी मुख्यमंत्री असेपर्यंत साहित्य संस्थांची स्वायत्तता अबाधित राहील,’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, साहित्य परिषद ताब्यात घेण्याचा उद्योग मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्याने आणि मार्गदर्शनाने सुरू असल्याचे पुणे पुस्तक महोत्सवाशी निगडित राजेश पांडे यांनी जाहीर केले असल्याचा आरोप परिवर्तन उत्कर्ष आघाडीचे निवडणूक प्रमुख विनोद कुलकर्णी यांनी केला. ‘मुख्यमंत्र्यांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल, तर त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा जाहीरपणे स्पष्ट करणे गरजेचे आहे’, अशी मागणीही त्यांनी केली.

दुसरीकडे, प्रचारासाठी आयोजित केलेल्या खासगी ऑनलाइन बैठकीचे बेकायदा ध्वनिचित्रमुद्रण करून ते प्रसारित करून बदनामी केल्याप्रकरणी कुलकर्णी यांच्याविरोधात साहित्य संवर्धन आघाडीतर्फे जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या आरोप-प्रत्यारोपांमुळे आगामी ४२ दिवस ‘तापलेले’ राहतील, याची हमी न मिळेल तरच नवल! परिषदेचा केलेला विकास आणि शंभरावे साहित्य संमेलन परिवर्तन उत्कर्ष आघाडीला तारणार, की प्रस्थापितांविरोधातील लाटेवर स्वार होत साहित्य संवर्धन आघाडी बाजी मारणार याचे उत्तर मिळण्यासाठी १५ मार्चपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

vidyadhar.kulkarni@expressindia.com