पुणे : ‘भारतात व्यावसायिक वाहन क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांचा (ईव्ही) स्वीकार वेगाने वाढत असून, अवजड मालमोटार आणि इतर वाहनांचा एकूण महसुली खर्च २०२६ पर्यंत पारंपरिक (डिझेल) वाहनांइतका होईल,’ असा दावा ‘एका मोबिलिटी कंपनी’कडून व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय क्षेत्रात मोठे योगदान देण्यासाठी एका मोबिलिटी सज्ज असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ‘दिल्ली ते मुंबई या लांब पल्ल्याच्या प्रवासात इलेक्ट्रिक अवजड मालवाहू कंपन्यांना आर्थिक फायदा होणार असून, प्रदूषणविरहित पर्यावरणाच्या दृष्टीनेही वाहननिर्मिती करण्यात येत आहे. निती आयोगाच्या अहवालानुसार २०२२ मध्ये इलेक्ट्रिक अवजड वाहनांचा खर्च जास्त होता. क्षमताही अत्यल्प होती आणि वापरामध्येही अडचणी येत होत्या. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानामुळे इलेक्ट्रिक मालवाहू वाहनांची क्षमता आणि मर्यादा वाढवून उत्पादन क्षेत्रात अधिक परिपक्वता येत असून, संतुलन साधणे शक्य होणार आहे. सध्या डिझेल इंधनावर आधारित वाहनांचा खर्च प्रतिकिलोमीटर वाढत असून, इलेक्ट्रिक अवजड वाहनांचा खर्च कमी होत आहे. यामुळे २०२६ नंतर इलेक्ट्रिक ट्रक्स आर्थिकदृष्ट्या फायद्याच्या ठरतील.’

भारतात वाहतूक क्षेत्रात अवजड वाहनांचा (ट्रक्स) ७६ टक्के हिस्सा आहे, एकूण वाहनांच्या फक्त ३ टक्के आहेत. तरीही कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात अवजड वाहनांचा वाटा ३४ टक्के आहे. एका मोबिलिटीच्या इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांचा अवलंब केल्यास उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी होईल.

प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांतही (बस) मोठी संधी आहे. भारतात इलेक्ट्रिक बस बाजार वेगाने वाढत असून, राज्य परिवहन उपक्रमांच्या ई-बस बाजार २०३० पर्यंत १९ ते २० पटीने वाढेल. चीनने २०२२ पर्यंत शहरी भागात इलेक्ट्रिक बसची संख्या ६० टक्के इलेक्ट्रिक केल्या आहेत. केंद्र सरकारने प्रधानमंत्री ई-ड्राइव्ह आणि ई-बस सेवा योजनांद्वारे २०३० पर्यंत १.५ लाख ई-बसेस तैनात करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामुळे वार्षिक ५ अब्ज किलोग्रॅम कार्बन उत्सर्जन कमी होईल आणि ०.८ दशलक्ष ई-बसेससाठी ४५ अब्ज किलोग्रॅम बचत शक्य आहे, असे एका मोबोलिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

इलेक्ट्रिक बसची सरासरी धावण्याची क्षमता २५० किलोमीटर अशी असून, प्रतिकिलोमीटर ६० रुपये असे गृहीतक मांडले, तरी याचा आर्थिक फायदा मोठा होणार आहे. ‘एका मोबोलिटी’ इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करण्यासाठी सज्ज आहे. – डाॅ. सुधीर मेेहता, संचालक, एका मोबिलिटी प्रा. लि.