पुणे : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहून सातत्याने आंदोलने केली जातात. मात्र, विद्युत दळणवळण (ई-मोबिलिटी) हेच त्यावरील व्यवहार्य उत्तर असल्याचे मत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी मांडले. पुण्याने या बाबतीत आघाडी घेतल्यास खरोखरच बदल घडण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राज्य सरकार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी), मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅ ग्रीकल्चर (एमसीसीआयए) यांच्यातर्फे आयोजित पुणे पर्यायी इंधन परिषदेच्या समारोप कार्यक्रमात ठाकरे बोलत होते. पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, परिवहन विभागाचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे, एमसीसीआयएचे महासंचालक प्रशांत गिरबने, एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रंगा नायर, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील आदी या वेळी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, पुणे हे शिक्षण, संशोधन आणि नवसंकल्पनांचे शहर आहे. त्यामुळे पर्यायी इंधनावरील परिषद या शहरात होणे आवश्यक होते. पुण्याने एक पाऊल पुढे टाकले, तर बदल शक्य आहे. प्लॅस्टिकबंदीलाही पुण्यातूनच सर्वाधिक प्रतिसाद मिळाला होता. जगभरातील विविध देशांचे राजदूत या परिषदेत सहभागी झाल्याने या परिषदेचा संदेश जगभरात जाईल. हवामान बदलाचे मोठे आव्हान समोर असताना ऊर्जा आणि दळणवळण या घटकांचा विचार करणे अपरिहार्य झाले आहे.

तळेगावमध्ये व्हेंडर पार्कची निर्मिती

विद्युत वाहनांसाठीची चार्जिग सुविधा विकसित करण्यासाठी दहा हजार एकरांत सोलर पार्क उभारण्यात येणार आहे. तसेच तळेगावमध्ये विद्युत वाहनांसाठी आवश्यक सुविधा असलेल्या (व्हेंडर पार्क) केंद्राची निर्मिती केली जाणार असून, समृद्धी महामार्ग आणि पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गासह राज्यातील सात शहरांत अडीच हजार चार्जिग केंद्र निर्माण केली जाणार आहेत.

दहा महापालिकांच्या आयुक्तांचा करार

पर्यायी इंधनावरील वाहनांसंदर्भात राज्यातील दहा महापालिकांच्या आयुक्तांशी ठाकरे यांनी चर्चा केली. या वेळी पर्यायी इंधनावरील वाहने वाढवण्याबाबतचा करारही करण्यात आला.