राज्यातील वीजबिल थकबाकी ३९ हजार कोटींवर!

महावितरणकडून प्रत्येक महिन्याला देण्यात येणारे वीजबिल नियमितपणे भरणाऱ्यांची संख्या कमी होत आहे.

(संग्रहीत छायाचित्र)

 

आर्थिक कोंडी झाल्याने थकबाकी वसुलीच्या मोहिमेला वेग

राज्यभरात सर्व प्रकारच्या वीजग्राहकांकडे तब्बल ३९ हजार कोटी रुपये वीजबिलाची थकबाकी असल्याने महावितरण कंपनीची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे वीजखरेदीसह ग्राहकसेवेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या दैनंदिन संचलनासह देखभाल- दुरुस्तीबाबतही समस्या निर्माण होत आहेत. या आर्थिक संकटातून बाहेर पडण्याच्या दृष्टीने थकबाकी वसुलीच्या मोहिमेला वेग देण्यात आला आहे.

महावितरणकडून प्रत्येक महिन्याला देण्यात येणारे वीजबिल नियमितपणे भरणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. त्यातून थकबाकीचा आकडा वाढत चालला आहे. थकबाकी वसुलीच्या दृष्टीने काही दिवसांपूर्वी ठोस कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यातून थकबाकीदारांचा वीजपुरवठा तोडण्याची कारवाई करण्यात येत आहे. सध्या या मोहिमेला वेग देण्यात आला आहे. महावितरण कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार,  वाढत्या थकबाकीमुळे महावितरण कंपनीची होत असलेली आर्थिक कोंडी पाहता थकीत वीजबिलांची वसुली अत्यावश्यक झाली आहे. प्रत्येक महिन्यात ग्राहकांकडून येणाऱ्या महसुलापैकी सुमारे ८५ ते ९० टक्के खर्च वीज खरेदीवर होत आहे. परंतु प्रत्येक महिन्यात अनेक ग्राहक वीजबिल भरत नसल्याने वीज खरेदीकरिता लागणारी आवश्यक रक्कमसुध्दा महावितरणकडे जमा होत नाही.

वीज खरेदीमध्ये उधारीचे दिवस संपल्याने चालू वीजबिलांसह थकबाकीची शंभर टक्के वसुली करणे आवश्यक झाले आहे. वीजग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी राज्य शासन व महावितरणकडून विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात आली. परंतु, वारंवार विनंती करूनही वीजग्राहकांनी या योजनांना अपेक्षित प्रतिसाद दिलेला नाही. या सर्व पर्यायानंतर महावितरणने थकबाकी वसुलीसाठी आता थेट वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे. तसेच ग्राहकांना वीजबिलासंदर्भात तक्रारी असल्यास  त्यांचे तातडीने निराकरण करावे अशा सूचना मुख्यालयातून यापूर्वीच देण्यात आलेल्या आहेत.

थकीत वीजबिल भरण्यासाठी राज्यभरातील स्थानिक वीजबिल भरणा केंद्रे तसेच घरबसल्या महावितरणच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने किंवा मोबाइल अ‍ॅपचा पर्याय उपलब्ध आहेत.  त्यामुळे ग्राहकांनी थकबाकीचा भरणा त्वरित करावा व वीजपुरवठा खंडित होण्याची नामुष्की टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

एक कोटी ४१ लाख वीजग्राहक थकबाकीदार

राज्यभरामध्ये तब्बल १ कोटी ४१ लाख ग्राहकांकडे वीजबिलाची थकबाकी आहे. ही थकबाकी ३९ हजार कोटींवर गेली आहे. जानेवारी २०१८ पर्यंतचे हे आकडे आहेत. त्यानंतरच्या थकबाकीचा विचार केल्यास हा आकडा आणखी वाढणार आहे. या थकबाकीत ५७ लाख ५६ हजार घरगुती ग्राहकांकडे सुमारे १ हजार ५०० कोटी,  ५ लाख ७३ हजार वाणिज्यिक ग्राहकांकडे ४७८ कोटी, १ लाख ५ हजार उच्च व लघुदाब औद्य्ोगिक ग्राहकांकडे ८४७ कोटी, ४१ हजार सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांकडे  सुमारे १ हजार ५०० कोटी, ७९ हजार पथदिवे ग्राहकांकडे सुमारे ३ हजार ३०० कोटी, ३८ लाख कृषी ग्राहकांकडे सुमारे २३ हजार कोटी, ४५ हजार २१९ यंत्रमाग ग्राहकांकडे सुमारे ९३८ कोटी, ५७ हजार इतर ग्राहकांकडे सुमारे ७९ कोटी रुपयांचा समावेश आहे. तसेच राज्यात ३ लाख ५७ हजार कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या थकबाकीदार ग्राहकांकडे ७ हजार कोटींची थकबाकी आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Electricity bill outstanding in maharashtra

ताज्या बातम्या