कारखाने, हॉटेल व सोसायटय़ांबरोबरच आता बीपीओमध्येही वीजचोरी उघड झाली आहे. विमाननगर येथील इन्फोनेट बीपीओ सव्र्हिसेस या कंपनीमध्ये तब्बल ३७ लाख ८१ हजार रुपयांची वीजचोरी महावितरण कंपनीने उघडकीस आणली आहे. या प्रकरणी कंपनीच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विमाननगर येथील गंगा इम्पोरिया या इमारतीमध्ये इन्फोनेट बीपीओ कंपनी आहे. या कंपनीसाठी महावितरणने वाणिज्यिक वीजजोडणी दिली आहे. कंपनीतील वीजवापराबाबत संशय निर्माण झाल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कंपनीतील वीजमीटरच्या यंत्रणेची तपासणी केली. या तपासणीमध्ये वीजमीटरला लावण्यात आलेले सील तुटलेले असल्याचे आढळून आले. प्राथमिक चाचणीमध्ये वीजमीटरची गतीही मंद असल्याचे दिसले. त्यामुळे पंचनामा करून हा वीजमीटर जप्त करण्यात आला.
महावितरणकडून करण्यात आलेल्या पुढील तपासणीमध्ये या वीजमीटरमध्ये फेरफार करून मीटरची कार्यप्रणाली बंद केल्याचे व त्यातून वीजचोरी केल्याचे स्पष्ट झाले. त्यातून कंपनीने एक लाख ३७ हजार ५६८ युनिट विजेची चोरी केल्याचे दिसून आले. या वीजचोरी प्रकरणी कंपनीचे प्रशासकीय अधिकारी संग्राम तामर, वीजजोडणीधारक जितेंद्र कपिलदेव गुप्ता व संचालक मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही चोरी उघडकीस आणण्यासाठी मुख्य अभियंता रामराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे, रमेश मलामे, कार्यकारी अभियंता गुलाबराव कडाळे, दत्तात्रय बनसोडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता गिरीश भगत, सहायक अभियंता कैलास कांबळे, विजय जाधव, राहुल पालके, अमित कांबळे, वैशाली पगारे, तंत्रज्ञ सागर देसाई, सतीश उंडे, नंदकिशोर गायकवाड, निर्मल देशमुख आदींनी सहभाग घेतला.