पुणे : एल्गार परिषद प्रकरणातील संशयित तसेच तेलगू विद्रोही कवी वरावरा राव यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या हार्डडिस्कचे तांत्रिक विश्लेषण करण्यासाठी अमेरिकेतील फेडरेअल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे (एफबीआय) साहाय्य घेण्यात येणार आहे.

एल्गार परिषद प्रकरण तसेच बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन अटक करण्यात आलेले वरावरा राव यांच्याकडून पोलिसांनी हार्डडिस्क तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या होत्या. त्यापैकी जप्त केलेल्या हार्डडिस्कचा काही भाग खराब झाला होता. राव यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या हार्डडिस्क चे विश्लेषण करण्यासाठी ती पुणे, मुंबई आणि गुजरातमधील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आली होती. मात्र, त्यातील माहितीचे विश्लेषण करण्यात काही अडचण आली होती. त्यातील मजकुराचे तांत्रिक विश्लेषण करण्यासाठी एफबीआयचे साहाय्य घेण्यात येणार आहे. याबाबत पुणे पोलिसांनी केंद्र सरकारला विनंती केली होती.

होणार काय? : केंद्रीय गृहविभागाने पुणे पोलिसांना याबाबत नुकतीच आवश्यक परवानगी दिली आहे. त्यानुसार जानेवारीमध्ये पुणे पोलीस दलातील अधिकारी तसेच न्यायवैद्यकीय तज्ज्ञ अमेरिकेत जाणार आहेत. तेथे हार्डडिस्कचे तांत्रिक विश्लेषण करण्यात येईल. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून कागदपत्रे तसेच मोठय़ा प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक डाटा जप्त करण्यात आला आहे. तांत्रिक पुरावा गोळा करणे तसेच विश्लेषण करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत असून त्यासाठी पुणे पोलीस अमेरिकन तपास यंत्रणेचे साहाय्य घेणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.