पुणे : मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा आदेश दिल्यामुळे भाजपमध्ये ब्राह्मणांचे खच्चीकरण केले जात आहे, असा आरोप अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने शुक्रवारी केला. देवेंद्र फडणवीस यांनाच एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाची घोषणा करायला लावण्यात आली. त्या वेळी ‘मी बाहेर राहून सरकारच्या पाठीशी असेन’, असे फडणवीस यांनी जाहीर केले होते. मात्र, अचानक राजकीय घडामोडी घडून फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली. त्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने फडणवीस यांचे खच्चीकरण केल्याचा आरोप महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी केला. कुलकर्णी म्हणाले, की गेल्या तीन वर्षांपासून फडणवीस यांची घोडदौड रोखण्यासाठी बहुमतापेक्षा अधिक संख्येने युतीचे आमदार निवडून आणल्यानंतरही सरकार न बनविण्याचे षडयंत्र रचण्यात आले. योजनाबद्ध पद्धतीने फडणवीस यांना सत्तेपासून लांब ठेवण्यात आले.

भाजपमध्ये ब्राह्मणांचे खच्चीकरण करण्याचे एक सुनियोजित कारस्थान सुरू आहे. पंतप्रधानपदाच्या स्पर्धेतून हटवण्यासाठी नितीन गडकरी यांचे चारित्र्यहनन करण्यात आले. आता योजनाबद्ध पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांना सत्तेपासून दूर ठेवण्यात आले.

– डॉ. गोविंद कुलकर्णी, अध्यक्ष, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ