‘कलावंतांसाठी खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन!’

करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या उद्देशातून नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

चित्र-नाट्यसृष्टीत भावना; प्रेक्षक वळविण्यासाठी छोटेखानी नाट्यमहोत्सवांची सूचना

पुणे : करोना प्रादुर्भावामुळे बंद असलेली नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे सुरू करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयामुळे दसऱ्यानंतर खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन होत आहे, अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांनी व्यक्त केली, तर प्रेक्षकांना पुन्हा नाट्यगृहामध्ये येण्याची सवय लागण्यासाठी शासनाने जिल्हा स्तरावर छोटेखानी नाट्यमहोत्सव भरवावेत, अशी सूचना ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी केली.

करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या उद्देशातून नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या वर्षी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून ५ नोव्हेंबरपासून नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर फेब्रुवारी अखेरपर्यंत नाट्यगृहे सुरू होती. नवे चित्रपट प्रदर्शनासाठी नसल्यामुळे बहुपडदा चित्रपटगृहे बंद होती. तर, अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे एकपडदा चित्रपटगृहे बंदच ठेवण्यात आली होती. नाट्यगृहे बंद असल्याने पडद्यामागच्या कलाकारांचे हाल झाले. अनेकांना उदरनिर्वाहासाठी वेगवेगळे व्यवसाय करावे लागले. आता २२ ऑक्टोबरपासून नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे सुरू होत असल्याने कलाकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

नाट्यगृहे सुरू करणे म्हणजे घराचे दार उघडून आपण आत जातो, असा हा गृहप्रवेश नाही. प्रेक्षकांना तिकिट काढून नाट्यगृहामध्ये येण्याची सवय लागणे हे महत्त्वाचे आहे, याकडे ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी लक्ष वेधले. त्यामुळे शासनाने एक पाऊल पुढे जाऊन जिल्हा पातळीवर त्या त्या गावातील संस्थांच्या मदतीने दोन-तीन नाटकांचे महोत्सव आयोजित केले, तर प्रेक्षकांना नाटक पाहण्याचे निमित्त मिळेल. त्या निमित्ताने नाट्यसंस्थांना आलेली मगरळ झकटली जाईल. नाटक करायचे म्हटल्यावर तालमी करूनच कलाकार रंगमंचावर आपली कला सादर करतील. हौशी आणि प्रायोगिक संस्थांना प्रोत्साहन मिळेल. प्रेक्षकांनी न घाबरता तिकिट काढून विश्वासाने येण्याच्या दृष्टीने वातावरण केले पाहिजे. त्यासाठी शासनाने हातभार लावावा, ही सूचना आहे, असेही आळेकर यांनी सांगितले.

नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे सुरू होणार याचा आनंद असून दसऱ्यानंतर खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन होत आहे, अशी भावना सुबोध भावे यांनी व्यक्त केली. छोट्या पडद्यावर चित्रपट पाहून सगळेच कंटाळले आहेत. किती तरी चांगले मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी प्रतीक्षेत आहेत. जिवंत नाटक पाहणे आणि मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्यात आनंद आहे. केवळ नाटकावर अवलंबून असलेले कलाकार आणि पडद्यामागच्या कलाकारांची हालत खराब आहे. चित्रपटाचे तर कंबरडे मोडले आहे. आता नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे सुरू होत आहेत याचा आनंद आहे, असे भावे यांनी सांगितले.

नाट्यगृहे, चित्रपटगृहे याआधीच सुरू व्हायला हवी होती. मूळ मुद्दा निर्बंधांचा नसून अनिर्बंध गोष्टी वाढत असल्याचा होता. राजकीय कार्यक्रम, सभा, मेळावे, उद्घाटने यांना परवानगी का, हा प्रश्न होता. मग नाट्यगृहे आणि चित्रपटगृहांमध्येच करोना होतो का, हा आमचा प्रश्न होता. नियमांचे पालन करायला आम्ही तयारच आहोत. पण, नियमांचे उल्लंघन जे करत आहेत त्याबाबत भूमिका काय आहे हा प्रश्न होता. पन्नास-शंभर प्रेक्षकांसमोर सादर होणाऱ्या प्रायोगिक नाटकांना यापूर्वीच परवानगी मिळायला हवी होती.

 – अतुल पेठे,  अभिनेते-दिग्दर्शक

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Emotions in picture drama suggestions for small drama festivals to divert the audience akp