पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील राज्य कामगार विमा योजनेच्या डॉक्टरांना गेल्या नऊ महिन्यांपासून वेतन (कॅपिटेशन फी) मिळालेली नाही. गेल्या पाच वर्षांत या डॉक्टरांची संख्याही झपाटय़ाने कमी झाली आहे. पाच वर्षांपूर्वी पुण्यात या योजनेचे २०० डॉक्टर काम करत होते. आता या डॉक्टरांची शहरातील संख्या अवघी ५० च्या आसपास उरली आहे.
राज्य कामगार विमा योजनेसंबंधी (ईएसआय) डॉक्टरांच्या असलेल्या प्रश्नांबाबत ३० जुलैला मुंबईत केंद्र आणि राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांबरोबर या डॉक्टर संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक झाली. परंतु या बैठकीत सध्याच्या डॉक्टरांच्या परिस्थितीबाबत तोडगा निघू न शकल्याची माहिती डॉक्टरांच्या फेडरेशनचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क अधिकारी डॉ. मधुकर सातपुते यांनी दिली. सातपुते म्हणाले, ‘डॉक्टरांना कॅपिटेशन फी वेळेवर मिळत नसून दर वेळी जवळपास ६ ते ९ महिन्यांचे पैसे राहिलेले असतात. ‘कर्मचारी बिमा निगम’कडून (ईएसआयसी) या योजनेसाठीचे पैसे राज्य सरकारला येतात. त्या ऐवजी योजनेतील डॉक्टरांचे पगार ईएसआयसीनेच करावेत असा प्रस्ताव आम्ही पूर्वीच दिला होता. परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. सध्या डॉक्टरांना गेल्या तीन तिमाह्य़ांचे म्हणजे ९ महिन्यांची कॅपिटेशन फी मिळालेली नाही.’
पाच वर्षांपूर्वी पुण्यात या योजनेचे २०० डॉक्टर होते, तर पिंपरी-चिंचवडमध्ये १०० डॉक्टर होते. आता ही डॉक्टरांची संख्या पुण्यात केवळ ५० तर पिंपरी-चिंचवडमध्ये २५ ते ३० एवढीच उरली असल्याचेही सातपुते यांनी सांगितले.
दवाखान्यातही असुविधा!
राज्य कामगार विमा योजनेचे प्रमुख रुग्णालय चिंचवडमध्ये मोहननगरला आहे. सातपुते म्हणाले, ‘अपघातात मार लागणे, हात मोडणे, उच्च रक्तदाबाच्या त्रासामुळे रुग्णालयात जाण्याची वेळ येणे, कुत्रा चावणे अशा आजारांसाठी ईएसआयच्या डॉक्टरांनी रुग्णाला मोहननगरच्या रुग्णालयात पाठवल्यानंतर तिथे जर संबंधित उपचार उपलब्ध नसतील, तर रुग्णाला वायसीएम रुग्णालयात पाठवले जाते. तिथेही उपचार उपलब्ध न झाल्यास रुग्णाला ससूनमध्ये जाण्याशिवाय पर्याय नसतो.’