पुणे : विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याबद्दल पोपटराव पवार, अनंत गोएंका, नसीमा हुरजूक, झीनत अमान, राजश्री बिर्ला यांच्यासह मान्यवरांना ‘ग्रॅव्हिट्स फाऊंडेशन’तर्फे ऊर्जा पुरस्काराने गौरविण्यात आले. फाउंडेशनच्या संस्थापक-अध्यक्षा उषा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमास अमृता फडणवीस, शर्मिला ठाकरे, मेधा कुलकर्णी आणि रुपाली चाकणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमाचे यंदा पाचवे वर्ष होते. सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी पोपटराव पवार यांना ऊर्जा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मीडिया अवॉर्ड अनंत गोएंका यांना प्रदान करण्यात आला.
सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी नसीमा हुरजूक आणि राजश्री बिर्ला यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात अरुणिमा सिन्हा, नीरजा बिर्ला, शीतल चव्हाण, सरुबाई वाघमारे, फिरोजा पारेख यांच्यासह शहीद सौरभ फराटे आणि शहीद राणे कुटुंबीय यांचा गौरव करण्यात आला. अभिनय क्षेत्रासाठी झीनत अमान यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. दृष्टिहीन असूनही जर्मन भाषेत पीएच. डी. केल्याबद्दल उर्वी जंगम, शैक्षणिक क्षेत्रातील कार्यासाठी डॉ. विद्या येरवडेकर, वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी अमिता फडणीस तसेच अभिनेत्री रिंकू राजगुरू, नृत्यदिग्दर्शिका फराह खान, क्रिकेटपटू केदार जाधव, उद्योजक योहान पूनावाला, अपंग क्रीडापटू सुयश जाधव यांना सन्मानित करण्यात आले. अक्षय बर्दापूरकर यांना ओटीटी अॅयवॉर्ड देण्यात आला. शहीद संग्राम पाटील यांना मरणोत्तर ऊर्जा शूरता पुरस्काराने गौरविण्यात आले. उषा काकडे म्हणाल्या, चांगले काम करून समाजाचे भूषण बनलेल्या व्यक्तींना सन्मानित करून त्यांच्याप्रमाणे चांगले काम करण्याची प्रेरणा इतरांना मिळत असल्याचा मला आनंद आहे.