पुणे : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) अभियांत्रिकी अभ्यासक्रम बारा भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सध्या इंग्रजीमध्ये असणाऱ्या अभ्यासक्रमाच्या भाषांतरासाठी अभियांत्रिकीचे शिक्षक आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार असून, भारतीय भाषांमध्ये भाषांतरित होणारे अभ्यासक्रम केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या स्वयम् या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जातील.
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेतून शिक्षणावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे एआयसीटीईने पदवीपूर्व स्तरावरील अभियांत्रिकी अभ्यासक्रम शिकण्यासाठी मातृभाषेचा पर्यायही गेल्या वर्षी दिला होता. त्यानुसार देशभरातील काही महाविद्यालयांनी मातृभाषेतून अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू केले आहेत.
८० अभ्यासक्रमांपैकी २१ ऑनलाइन अभ्यासक्रमांचे भाषांतर करण्याचे काम एआयसीटीईकडे देण्यात आले होते. त्यापैकी प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या तीन अभ्यासक्रमांचे काम एआयसीटीईने पूर्ण केले आहे, तर अन्य तीन स्वयम् ऑनलाइन अभ्यासक्रम आठ भारतीय भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर अन्य अभ्यासक्रमांचे काम पूर्ण करण्यासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि शिक्षकांची मदत घेतली जाणार असल्याचे एआयसीटीईने नमूद केले आहे.
मानधन आणि प्रमाणपत्र
भाषांतराचे काम करण्यासाठी पदव्युत्तरचे विद्यार्थी आणि शिक्षकांना एका भाषेसाठी प्रति तास साडेतीन हजार रुपये या दराने मानधन एआयसीटीईने निश्चित केले आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांना त्यांच्या आवडीची भाषा निवडता येईल. भाषांतराचे काम पूर्ण झाल्यावर भाषांतरकारांना प्रमाणपत्रही प्रदान केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
होणार काय?
अभियांत्रिकीचे ८० अभ्यासक्रम बारा भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करण्याचे निर्देश एआयसीटीई आणि आयआयटी मद्रास यांना देण्यात आले आहेत. बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, तमीळ, हिंदी, तेलुगू, आसामी, ओडिया, पंजाबी आणि उर्दू या भाषांमध्ये अभ्यासक्रमांचे भाषांतर करण्यात येईल.