पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या अभियांत्रिकीच्या प्रथम व द्वितीय वर्षांसाठीच्या ऑनलाईन परीक्षा पूर्णत: बेकायदेशीर असल्याची माहिती समोर आली आहे. या ऑनलाईन परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार केवळ परीक्षा मंडळाला असून अभियांत्रिकीच्या ऑनलाईन परीक्षांबाबतचा ठराव परीक्षा मंडळाने केलाच नसल्याची धक्कादायक माहिती परीक्षा मंडळातील सूत्रांनी दिली आहे.
अभियांत्रिकी विद्याशाखा आणि विद्या परिषदेने मिळून ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असून या दोन्ही संस्थांना परीक्षा पद्धतीतील सुधारणांबाबतचे ठराव करण्याचा अधिकारच नाही. विशेष म्हणजे ऑनलाईन परीक्षांमध्ये होत असलेले गैरप्रकार विद्यापीठाच्या अधिसभेत पुन्हापुन्हा मांडले जाऊनही कुलगुरू, अभियांत्रिकी शाखेचे अधिष्ठाता आणि विद्यापीठ प्रशासनाने ऑनलाईन परीक्षांबाबत पुर्नविचार करण्याची तसदी घेतलेली नाही.     
अभियांत्रिकी विद्याशाखेचे अधिकार महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याच्या कलम ३३ व ३४ मध्ये स्पष्ट केले आहेत. तर विद्या परिषदेचे अधिकार कलम ३० मध्ये नमूद केले आहेत. विद्याशाखा, विद्या परिषद आणि अभ्यास मंडळ यांपैकी कोणत्याही मंडळाला ऑनलाईन परीक्षांबाबत निर्णय करण्याचा अधिकार नाही. परीक्षा पद्धतीतील सुधारणा आणि या पद्धतीतील नवे प्रयोग याबद्दल केवळ परीक्षा मंडळ निर्णय करू शकते. परीक्षा मंडळाने यापूर्वी अभियांत्रिकीच्या केवळ प्रथम वर्षांची परीक्षा ऑनलाईन घेण्यास मान्यता देण्याचा ठराव केला होता. या परीक्षांमधील त्रुटी तपासण्यासाठी वेगळी समिती नेमून त्या समितीने आपला अहवाल परीक्षा मंडळाला सादर करावा आणि त्यानंतरच ऑनलाईन परीक्षांबाबत अंतिम निर्णय करण्याचे ठरले होते. प्रत्यक्षात मात्र परीक्षा मंडळाच्या परवानगी शिवाय अभियांत्रिकी विद्याशाखा व विद्या परिषदेने ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला व त्याची अंमलबजावणीही सुरू झाली.    
अभियांत्रिकीच्या प्रथम व द्वितीय वर्षांच्या परीक्षांसाठी शंभरपैकी ५० गुणांची परीक्षा लेखी तर ५० गुणांची परीक्षा ऑनलाईन घेतली जाते. विद्यार्थी उत्तीर्ण होण्यासाठी त्याला लेखी व ऑनलाईन परीक्षांमध्ये मिळालेले एकत्रित गुण धरले जातात. परंतु ऑनलाईन परीक्षांमध्ये विद्यार्थी परीक्षेच्या वेळात कॉपी करण्यासाठी इंटरनेटचा वापर करत असल्याचे आढळून आले आहे. तसेच काही महाविद्यालयांमध्ये शिक्षकच विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेत मदत करत असल्याचेही दिसून आले आहे. ऑनलाईन परीक्षा देताना इंटरनेटचा मुक्त वापर शक्य असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेत भरमसाठ गुण मिळतात. ऑनलाईन परीक्षांमधील गैरप्रकार आणि अशा प्रकारे गुण मिळवणाऱ्या अभियंत्यांच्या भविष्यावर होऊ शकणारा विपरित परिणाम हे मुद्दे विद्यापीठाच्या अधिसभेत वारंवार चर्चिले गेले आहेत. परीक्षा मंडळासमोरही हे मुद्दे मांडण्यात आले आहेत. विद्यापीठाच्या अधिसभेत ऑनलाईन परीक्षेच्या मुद्दय़ावर आतापर्यंत ४ ते ५ वेळा स्थगन प्रस्ताव मांडला गेला आहे. असे असूनही कुलगुरू, अभियांत्रिकी शाखेचे अधिष्ठाता, विद्यापीठ प्रशासन ऑनलाईन परीक्षांबाबत उदासीनच असल्याचे दिसून येत आहे.